☆ कवितेचा उत्सव ☆ लुब्ध होई धरा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
विष्णुकांती नभा, लुब्ध होई धरा
साठवे मृत्तिका, हर्ष तो बावरा
लुब्ध होई धरा…
स्पर्श नाजूकसा, थेंबधी झेलता
शिर्शिरी सृष्टिला, पावसा तोलता
गंधवा~यासही नाद ये मदभरा
लुब्ध होई धरा…
मेघ वर्षावती श्वास ओथंबले
वल्लरी वृक्षही भारले, गंधले
आगळे तेज ये शुभ्रशा निर्झरा
लुब्ध होई धरा…
सप्तरंगी झुला इंद्रधनु बांधतो
सोहळा देखणा पंख फ़ैलावतो
मीलनातूरसे रूप ये अंबरा
लुब्ध होई धरा…
चेतना अमृती जीवनी जागते
धुंद आलिंगनी नभ-धरा गुंगते
गर्भ मातीतला अंकुरे साजिरा
लुब्ध होई धरा…
गर्द हिरवा ऋतू ,सृष्टि नादावते
रोमरोमी तिच्या सौख्य रेंगाळते
तृप्ततेच्या नभी घन खुले हासरा
लुब्ध होई धरा…
© सुश्री आसावरी केळकर-वाईकर
चेन्नई
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
शब्दसौंदर्याने नटलेली सुंदर कविता.