सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ जीवनयात्रा ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
रोज थोडा पथ नवा
जीवन एक तीर्थयात्रा
सुखदुःख “थांबे” असे
प्रवासात या सतरा
भान ठेवू, चालताना
अवघड – सोपी वाट
वळणावळणा वर
आशा निराशेचा काठ
भावनांचा कल्लोळ तो
भार आता साहवेना
काय खरे,काय खोटे
माया मोह तो, सुटेना
पाप पुण्याच्या राशी तू
ओलांडून जात रहा
जन्म मरणाची वेळ
तटस्थ, पाहात रहा
पैलतीर खुणावतो
दोन क्षणांचा विसावा
सत्कर्मी त्या सेवाधर्मी
हृदयीचा राम दिसावा.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
२९/३/२०२१
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈