प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ रोज पारिजात सडे…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
हृदय ओतले पहा जीव तुझ्या वरती जडे
अंगणात पडती पहा रोज पारिजात सडे ….
रंगले अबोली हात ,साथ तुझी लाभता
बोल सतारीचे बोल हृदयी नाथ आता
वाजंत्री घुमती मनी सप्तपदी चौघडे…..
अंगणात पडती पहा …..
अंतरंगी तू असा भरूनी माझ्या राहिला
अश्वारूढ मी तुला नयनातच ठेविला
मेंदिला चढला रंग ओठ हृदय धडधडे
अंगणात पडती पहा ….
जाईंचा तो येई गंध मोगऱ्यास बहर ये
सखया रे राजस तू बहरलेच चांदणे
प्राण पाखरूच बघ तुजसाठी फडफडे
अंगणात पडती पहा …
रोज पारिजात सडे ….
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈