श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ ☆ रूबाया ☆☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
संघर्ष जयांची वाणी ते बंद जाहले ओठ
सत्तेची मिळता उब का सुटते यांचे पोट ….1
अस्वस्थ मनाचे क्रंदन ना कधी कुणाला कळले
न्यायाच्या शोधासाठी अन्याय साहूनी जगले ….2
रंक असो वा राजा भय सुटले नाही त्याला
जो तो रिचवत गेला नशिबाचा जहरी प्याला ….3
जे होऊन गेले थोर त्यांची कवने गाऊन झाली
आचरण्या त्यांचे काही पण वेळ कुणा ना जमली ….4
मामला असे चोरीचा भय उरले नाही कोणा
अंधार व्यापतो जगता झाला प्रकाश केविलवाणा ….5
सत्तेचा चाबूक दिसता सत्यास कापरे भरते
पाहूनी आंधळा न्याय गुन्ह्यास बाळसे धरते ….6
हे म्हणती नाही केली ते म्हणती नाही केली
मज सांगा मग कोणी ही भ्रष्ट व्यवस्था केली ….7
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खुप सुंदर रचना