सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ गावचा दिस…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
झुंजूमुंजू झालं
नभी तांबडं फुटलं
दिनमणी उगवला
कोंबडं आरवलं……
जलभरण्या निघाल्या
आयाबहीणी नदीतीरी
घरट्यातल्या पक्षिणी
पिल्ला दाणापाणी चारी…..
दारी अंगणी तुळस
पुजिते गृहस्वामिनी
बहरली वृंदावनी
चिंती सौभाग्य मनोमनी….
बैल जोडूनी गाडीला
बळीराजा तो निघाला
कांदा भाकरी न्याहारी
पिका पाणी पाजायाला…..
न्यारं औंदाचं वरीस
कृपा वरूण राजाची
डोले वावर शिवार
बोंडे भरली मोत्याची…..
सणासुदीचे हे दिस
घर आनंदे भरले
सदा सुखी ठेव बाप्पा
हेच मनी इच्छियेले…..
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈