लिहिली नसती कविता
तर काहीच बिघडलं नसतं
मनातल्या मनात काहीतरी
खदखदत राहीलं असतं
मिळालं नसतं स्वास्थ्य
कदाचित झोपही नसती लागली
गुंजत राहिली असती काळजात
वर्तमान भूत भविष्याची
शुभाशुभाची प्रश्नावली
प्रश्र्न ही माझेच आणि
उत्तरं माझीच असती
आणि मग मीच माझ्याशी
लढलो असतो कुस्ती
बघणारा मीच लढणारा ही मीच
एकांतात.
करून घेतला असता
मग मीच माझा घात
पण—————–
लिहिता झालो बरे झाले
निचरा होऊन मार्ग सापडले
आता कधी तरी तापतो तळपतो
आपोआपच शांत होतो
शब्दांशी लढतो त्यानाच कुरवाळतो
पुन्हा सामान्य होऊन सरकतो पुढे
आयुष्याचे चढ उतार चढण्यासाठी
जगण्याशी दिलखुलास लढण्यासाठी
हरण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈