कवितेचा उत्सव
☆ जुने दिवस ☆ मेहबूब जमादार ☆
गेले ते जुने दिवस
आठवणीत राहीलेले
पुन्हा पुन्हा स्मरूनी
काळजात दाटलेले
विश्वासाचं नातं कसं
ठेवूनी होतं मनांत
सोनंही पिकायचं
माळावरच्या रानांत
दरोड्याची नसे चिंता
चोरी कधी नसायची
काठीला सोनं बांधून
दिवसा माणसं फिरायची
हरे एक घराला कसा
माणूसकीचा वास होता
घराच्या सर्वा भिंतीना
आपुलकीचा श्वास होता
कांही कुठे घडले तर
माणसं पळत यायची
सा-या सुख दु:खात
संगत सोबत करायची
हल्लीचा पाऊस तर
केंव्हाही पडत असतो
रानांतल्या पिकांसह
शेतक-यांना रडवत असतो
आता कांही झालं तरी
जवळ कोण येत नाही
माणूसकीचं दार सुध्दा
शेजारी उगडत नाही
आज सारं आठवता
डोळे भरून येतात
गतकालीन स्मृतीनां
मनांत कोंब फुटतात
© मेहबूब जमादार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈