प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ मज साद तुझी आली … ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
बाहेर चांदण्यात ,मज साद तुझी आली
आणि पुन्हा नव्याने ,मी पहा सजुनी आली ….
तो चंद्र तो चकोर, मन होई भावभोर
तो शीत शीत वायु, तो गगनी चंद्रमोर
तू शोध मज आता..मी भाव वेल झाली…
बाहेर चांदण्यात ……
तू मोकळा मुकुंद,मज दूर हाक मारी
मी बैसले रे येथे , बघ कालिंदी किनारी
मज शोध शोधता रे , भूमी धुक्यात न्हाली
बाहेर चांदण्यात ….
अद्वैत रे मनांचे,उठले पहा तरंग
पाण्यात दर्पणी या, मज भासतो श्रीरंग
मी मनी दर्पणात,तेव्हा तुझीच झाली
बाहेर चांदण्यात …
हा खेळ जीवनात, प्रीतीत डुंबण्यात
हृदयात बैस माझ्या,ठेवते लोचनात
तू आठवे मनात, चढली पहाच लाली..
बाहेर चांदण्यात …
मज साद… तुझी…
आली ……
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: ०२/०२/२०२१, वेळ : रात्री: १२:२४
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
Nice…✍️???