कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव
☆ आली धन त्रयोदशी.. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी)
दीपावली सणवार
अश्विनाची त्रयोदशी
निरामय आरोग्याची
आली धन त्रयोदशी.. . !
आरोग्याची धनवर्षा
वैद्य धन्वंतरी स्मरू
दान मागू आरोग्याचे
प्रकाशाची वाट धरू. . . . !
लावू कणकेचा दिवा
करू यम दीपदान
लाभो मनी समाधान
मागू आयुष्याचे दान . .. . . !
तन, मन, आणि धन
यांचे वरदान नवे .
धन त्रयोदशी दिनी
स्नान अभ्यंगाचे हवे.. . . !
धन, धान्य, आरोग्याने
घरदार सजलेले .
सुखी, समृद्ध जीवन
अंतरात नटलेले.. . . !
धन त्रयोदशी दिनी
माय माउलीचे न्हाणे
अन्नपूर्णा तिच्या ठाई
गाई आनंदाचे गाणे. . . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈