श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ हेतू…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
बोलले काही कुणी, …विसरून जा
त्यातला हेतू जरा …समजून जा
गर्द ओला मेघ होऊनी दयेचा
‘चातकां’साठी सदा …बरसून जा
उंबरा ओलांडुनी ये अंगणी तू
या ऋतूंनी वाळुनी…बहरून जा
भेट होण्याला तुझ्या संगे तुझी रे
एकदा गर्दीत या …हरवून जा
वादळांनी लक्तरे झाली तरीही
तू निशाणा सारखा …फडकून जा
हुंदके दाबून अश्रू झाकुनी ते
गांजल्या.. दुःखी जगा …हसवून जा
हार-जीताचा नको आनंद..चिंता
जीवनाचा हा लढा …लढवून जा
क्रंदते आहे तिथे कोन्यात कोणी
दो घडीसाठी तरी…थबकून जा
माणसांची ही मने; ओसाड राने
गाव स्वप्नांचे तिथे …वसवून जा
आडवे आले कुणी, थांबू नको रे
तू प्रवाही; आपणा …वळवून जा
शोध सोडूनी सुखाचा; भेटलेल्या
तू सुखे ‘दुःखा’ उरी… कवळून जा
आपल्यांचा; ना फुलांचा ही भरोसा
आपली तू पालखी …सजवून जा
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈