कवितेचा उत्सव
☆ इथेच आणि या बांधावर☆ “काव्यतीर्थ” कवी सुधांशु ☆
इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ
सख्या रे, किती रंगला खेळ !
शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जिवांचा अवचित जमला मेळ.
रातराणीचा गंध दरवळे
धुंद काहीसे आतून उसळे
चंद्र हासला,लवली खाली नक्षत्रांची वेल.
पहाटच्या त्या दवात भिजुनी
विरली हळुहळु सुंदर रजनी
स्वप्नसुमांवर अजुनी तरंगे ती सोन्याची वेळ.
– “काव्यतीर्थ” कवी सुधांशु
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈