कवितेचा उत्सव
☆ मुक्तिसूक्त.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : पादाकुलक)
घमघमले हे कुठून अत्तर
कुठून आला गंध चंदनी
सडा अंगणी स्फटिकशुभ्रसा
शिंपित आली कोण चांदणी ?
दूर राउळी घणघण घंटा
नाद निनादे चराचरातुन
पार दिशांच्या आर्त प्रार्थना
भिजवी मजला कवेत घेवुन !
कशा अचानक पेटुन उठल्या
मिणमिण पणत्या नक्षत्रांसम
रुजले कंठी अभाळगाणे
दिव्य सुरांची रिमझिम रिमझिम !
अगम्य भवती धुके दाटले
धरा कोणती,कुठले अंबर ?
शोधित होतो ज्या सत्याला
स्वप्नाहुन ते दिसले सुंदर !
खळखळ तुटल्या कशा शृंखला
मुक्तिसूक्त ये अवचित कंठी
पल्याड माझ्या मीच पोचलो
सात सागरा माझ्या भरती !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈