सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
☆ यावे यावे नववर्षा… ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
यावे यावे नववर्षा
स्वागत आपुले अति हर्षा धृ
आनंदात येऊनी, आनंदमय जगुनी
निःस्वार्थाचा हात धरूनी
समता धाग्याने वस्त्र विणूनी
समतोलाचे तत्व आचरणया
यावे यावे.
विज्ञानाची कास धरुनी
साध्य व साधन भेद करुनी
मानवतेचा पंथ चालूनी
अहंकाराचे दमन कराया
यावे यावे
स्वत्वाची मर्यादा ओळखूनी
प्रपंचात परमार्थ साधूनी
बंधू त्याला देव मानुनी
न्याय नीतीचे पालन करण्या
यावे यावे नववर्षा
प्रीतीचे हास्य फुलवुनी
विषमतेची आग विझवुनी
भ्रष्टाचारा मुठमाती देवूनी
प्रेमाचे संगीत गावया
यावे यावे नववर्षा
कलिकाळाची ओळख घेऊनी
अंतस्थ व बाह्य शत्रू ओळखूनी
विशाल दृष्टिचे दान देवूनी
एकात्मिक तेची फुले वेचण्या
यावे यावे नववर्षा
सद्गुणांचे मूल्य जाणूनी
माणूसकी चे शिल्प खोदुनी
भारतभूची कीर्ती वाढवूनी
गतवैभव हे प्राप्त कराया
यावे यावे नववर्षा
स्वागत आपुले अति हर्षा
© सौ. विद्या वसंत पराडकर
पुणे.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈