कवितेचा उत्सव
☆ एकसुरी आयुष्याला ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
एकसुरी आयुष्याला
सप्तसूर आता देऊ
छप्परात नभांगण
कुंपणात दिशा घेऊ !
शोधू नव्या रानवाटा
चाकोरीस थोडे तोडू
ओळखीच्या भूगोलास
नवे खंड काही जोडू !
क्षुद्र भूमी शृंखलांची
सात नभा साद देऊ
महात्म्याच्या कंठातील
प्रार्थनेचे नाद होऊ !
आधी बिंदू अंती सिंधू
प्रवाहात ऐशा वाहू
शून्यातून ब्रह्मांडात
उत्क्रांत गा होत राहू !
जरी तम अंथराया
थोडी नक्षत्रे पांघरू
मरणाच्या गर्भीसुद्धा
पुनः पुन्हा जन्मा येऊ !
साऱ्या विश्वाच्या वेदना
रात्री नभांगणी पाहू
चांदण्यांच्या पाझरात
आपणही थोडे भिजू !
साऱ्या सीमांच्या पल्याड
एक गाव तेथे जाऊ
देव,दैवत,आराध्य
मानव्यात सारे पाहू !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈