कै. सिंधुताई सपकाळ
कवितेचा उत्सव
☆ माई… ☆ सुश्री आशा नलवडे ☆
?माई कुठं सापडलं ग दार तुला,
सर्व संकटातून बाहेर पडायला,
जवळ केलस तू झिडकारलेल्या जींदगीला,
पारखी झाली होतीस तूच चिमूटभर दयेला,
तव्हांच पिळ पडला का ग तुझ्या रिदयाला.
? संकटाची झगडताना मायचाबी आधार तुटला,
तवां बोटभर चिंधी बी नाय आली कामाला
अथांग सिंधू होण्याच वचन तवांच दिलस देवाला
भूकेलेलेल्या भाकर दिलीस चिमटा काढून पोटाला,
देवालाच दया आली ताकद दिली जगायला.
? मनाला दिलीस उभारी बळ आले लढायला,
जे षोटात तेच व्हटात म्हणून वाचा फोडलीस अन्यायाला,
सय येते बहिणाबाईंची ऐकून तुझ्या शब्दाला,
पोटासाठी,धनासाठी कित्येक जवळ करतात शिक्षणाला,
पाटीपुरती अक्षरे गिरवून ‘माय’ न्याय दिलास बापाला.
? बापामुळेच शिक्षणाचा अर्थ कळला तुझ्या रिदयाला,
हृदयातील शिक्षणाने ‘धडा’दिला जगाला,
फार मोठी झेप तुझी गवसणी गगनाला,
निराधारांसाठी दूर ठेवलेस काळजातील ‘ममतेला’,
सोताचे अश्रु गिळून आनंद दिलास जगाला….
….खूप काही तुझ्याकडून शिकायला मिळाले आम्हांला.?
© सुश्रीआशा नलवडे
बोरीवली
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈