श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ जगावेगळी माउली ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
कै. सिंधुताई सपकाळ
फाटून लक्तरं झालेलं कापड
जे उपयोगी येत नाही कधी
तसाच तुझाही तेव्हाचा जन्म
म्हणून नाव ठेवलं गेलं चिंधी!
सोसल्यास अनंत समाजकळा
लावत अनाथांना माउली लळा
गुरे वळवताना वळवलस मन
गुरांसह घेतलंस शिक्षण धन !
शेणाचे महत्त्व जाणून तुझे
लिलावाविरुध्दचे संतापी बंड
शीलावरचा वज्राघात सोसत
मोजलीस गं काळीज किंमत!
रस्तोरस्ती भीक मागितलीस
अनाथपोरक्यांची आई झालीस
दिलेली भीक विसरून गेले
आईपण तुझ्या पदरात टाकले!
विविध संस्थांची उभारणी करत
समाजाशी ऋण बांधत बांधत
लेकुरवाळी झालीस तू सिंधूमाई
हीच तुझ्या आयुष्याची कमाई !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈