कवितेचा उत्सव
प्रे म भा व
श्री प्रमोद जोशी
शब्दांचेच तीळ,
शब्दांचाच गूळ,
स्नेहाचे हे मूळ,
शब्दातीत!
सत्य तरी गोड,
बोलणे कठीण,
सैल होई वीण,
नात्यातली!
संक्रांत निमित्त,
स्नेह हाच हेतू,
उभारावे सेतू,
मनोमनी!
सौहार्द्राएवढे,
विधायक काय?
पाण्यावरी साय,
येऊ शके!
कोरडा न व्हावा,
प्रेमाचा ओलावा,
अभंग रहावा,
भाव बंध!
दोघानिही थोडे,
सरकावे मागे,
तेव्हा पुन्हा धागे,
गुंततात!
तिळातला स्नेह,
गुळातली गोडी,
सुटतात कोडी,
अबोलीची!
प्रमोदे प्रमाद,
जरी झाला असे,
अंतरात वसे,
प्रेमभाव!
अभंगाची कळा,
स्वतःहून आली,
व्हावी सदाफुली,
अबोलीची!
चुकल्याची क्षमा,
मनस्वी मागतो,
मनस्वी सांगतो,
गोड बोला!
© श्री प्रमोद जोशी
देवगड. 9423513604
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈