श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ मूढ मानवा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
सुख स्वप्नांच्या, सागरात या, शोधू नको रे मोती
मूढ मानवा, हाती येईल, रेती.. केवळ रेती ||धृ.||
तृषार्त होतो आपण जेव्हा, व्याकुळ थेंबासाठी
आभासाचे मृगजळ बांधी, दैव आपुल्या गाठी
तू आशेच्या मागे, तुझीया कर्म धावते पुढती ||१||
शिखरावरती सौख्यसूर्य तू, नित्य पाहिले नवे
परिश्रमाने जवळी जाता, ते ठरले काजवे
निःश्वासांच्या मैफिलीत मग, श्वास जोगीया गाती ||२||
लाटेवरती लाट त्यावरी, घरकुल अपुले वसले
दुर्दैवाच्या खडकावरती, दीप आशेचे विझले
जा अश्रूंच्या तळ्यांत काळ्या, मालव जीवन ज्योती ||३||
नको रंगवू स्वप्न सुगंधी, तू अभिलाषांचे
गंधाभवती असती विळखे, काळ्या सर्पांचे
माध्यानीला ग्रासून जातील, दाट तमाच्या राती ||४||
कोण, कुणाचा? फसवी असते, सारी माया जगती
रक्त पिपासू अखेर ठरती, ती रक्ताची नाती
ममतेचे मग रिते शिंपले, कशांस घेतो हाती? ||५||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈