सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ भेट देवाची ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
उभी होते भर रस्त्यात
भेदरलेली घाबरलेली
कसा करू रस्ता पार
विचाराने भांबावलेली…..
अनपेक्षित कोणीतरी
धरला माझा हात
नको भिऊ उगा अशी
देतो तुला साथ…..
होता तो अनोळखी
कसनुसे झाले मला
पण सात्विकता नजरेतली
फारच भावली मला….
धोतर पैरण वेष त्याचा
भाळावरती टिळा
छेडत होता एकतारी
माला रुद्राक्षाची गळा….
ठसले रूप मनात
वाटले भगवंत भेटला
मदत करून मला
दिसेनासा झाला….
नाही उरली भीति
सत्य उमगले मला
नाही कोणी अनोळखी
माणसात देव भेटला….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈