? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा पडावा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

पाऊस असा पडावा

जुना शिशिरही कळावा.

पानगळीच्या वृक्षांशी,

स्नेह नव्याने जडावा.

 

पाऊस असा पडावा,

रक्तात मल्हार न्हावा.

मैफलीत सांगतेच्या,

स्वर आतला कळावा .

 

पाऊस असा पडावा,

पाऊस असा जडावा.

अव्यक्त सार्‍या व्यथांचा,

अभिव्यक्तीने व्यक्त व्हावा.

 

पाऊस असा पडावा ,

पाऊस असा कळावा.

थेंब होउन छोटा,

पापणीत बंद व्हावा.

 

पाऊस असा पडावा,

मृदगंधाचा सुगंध यावा.

मृगदुग्धांच्या सरींनी ,

अर्थ आईचा कळावा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments