श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ आकाश मोकळे सारे ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
तू मार भरारी आता
आकाश मोकळे सारे,
पंखात वादळी वारे
घेऊन वेच तू तारे
तेजोमय दिव्यत्वाची
मानसी पेटवी ज्योत,
तव उदंड कर्तुत्वाला
माहित नसावा अंत
आभाळी भिरभिरताना
स्मरणात असावी माती
भूमीवर जोजविलेली
हळूवार जपावी नाती
अक्षरे देऊनी गेली
ज्ञानाचे अमृत तुजला
हे अमृत पाजीत जा तू
जो तृषात आहे त्याला
प्रगतीच्या वाटेवरुनी
क्षण वळून बघ तू मागे,
देतील प्रेरणा तुजला
नात्यातील नाजुक धागे
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈