श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ रणी उतरतो सर्वांसाठी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त: वनहरिणी)
रणी उतरतो सर्वांसाठी,भोग भोगतो सर्वांचे मी……..
उपकाराचे ढोंग कशाला,रणांगणी ह्या माझ्यास्तव मी!
तरीहि येतो कोणी दारी,जखमांवर घालाया फुंकर
पराभूत मी परंतु ज्याच्या,दाटे कंठी माझा हंबर !
तेच कपातिल फुटकळ वादळ, तीच चहाची अळणी धार
तूफानांनो तुमच्यासाठी,सताड उघडे केले दार !………..
प्रभंजनाशी घेता पंगा,संहाराची व्यर्थ रे तमा
साती सागर ओलांडू वा निमूट होऊ इतिहासजमा!
पैल पोचता क्षणात कळते, हा न किनारा ध्यासामधला
क्षणभर वाटे उगीच केला, ऐल पारखा रक्तामधला!….
जागा होतो कैफ पुन्हा तो, शिडात भरतो उधाण वारा
पुन्हा सागरी नाव लोटणे, शोधाया तो स्वप्नकिनारा !…
झिजता झिजता वर्धमान मी,आटत आटत अथांग होतो….
तुझी नि माझी एक कहाणी, आत्मकथेतुन सांगत असतो !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈