सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
परिचय
नाव : – सौ . पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
शिक्षण : – बी कॉम, ए.टी.डी., आर्ट मास्टर
आवड : – कविता करणे, वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिणे . वाचन आणि पर्यटन
नोकरी : – CBSE स्कुल मध्ये ड्रॉईंग टिचर म्हणुन सहा वर्ष कार्यरत आहे .
कार्यशाळा : – कॅनव्हास पेंटीग, ओरिगामी, फ्लुएड आर्ट, क्राफ्ट वर्क पोत निर्मिती, बांधणी वर्क अशा अनेक कार्यशाळा मी घेते .
फ्लुएड आर्ट : – यामध्ये ॲक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हासवर पेंटीग केले जाते . याचे पुर्ण किट मिळते.
कॅनव्हास पेंटींग : – यामध्ये ॲक्रॉलिक, ऑईल कलर्स चा वापर करून पेंटीग केले जाते.
ओरिगामी : यामध्ये पेपर च्या घड्या घालुन कागदापासून कलाकृती साकारली जाते .
बांधणी वर्क : बांधणी वर्क च्या कार्यशाळे मध्ये वेगवेगळ्या प्रकारे बांधणीचे प्रकार शिकवले जातात . यामध्ये कापडावर बांधणी प्रिंट शिकवले जाते.
क्राफ्ट वर्क : – यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले पेपर पासून, कापडापासून बनविण्यास शिकविली जातात . तसेच नॅपकिन पासुन फुले व त्याचा बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठी क्लेपासुन छोट्या छोट्या कलाकृती करण्यास शिकविले जाते.
व्हेजिटेबल, फ्रुट कार्व्हिंग : – फुले, पाने, पक्षी हे व्हेजिटेबल फ्रुट पासुन कार्व्ह करायला शिकविले जाते.
कवितेचा उत्सव
☆ माझी कविता ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
सांधत गेले बांधत गेले
शब्दांना या रांधत गेले . . . .१
आंबट गोड चविच्या संगे
शब्दांना त्यात मुरवत गेले
कधी हसूनी कधी रुसूनी
शब्दांना मी रुजवत गेले
सांधत गेले बांधत गेले . . . .२
मोहरीपरी तडतड उडले
लाह्यांसंगे अलगद फुलले
पाण्यासंगे संथ विहरले
शब्दांचे जणू रंग बदलले
सांधत गेले बांधत गेले . . . .३
चांदीच्या त्या ताटांमधुनी
पानांच्याही द्रोणांमधुनी
कधी अलवार ओंजळीतही
शब्दांना परी मांडत गेले
सांधत गेले बांधत गेले . . . .४
महिरपीतल्या नक्षीमधले
चित्रावतीच्या थेंबामधले
आचमनाच्या उदकामधले
शब्दांना मी सजवत गेले
सांधत गेले बांधत गेले . . . .५
तिखटपणाने कधी खटकले
खारे शब्दची नाही रुचले
दोघांमधली दरी संपता
पंक्तीमधुनी सजुनी गेले
सांधत गेले बांधत गेले . . . .६
मुखवासासम ते पाझरले
मुखातुनी या हास्य उमटले
जीवन माझे शब्दची झाले
कवितेचे ते कोंदण ल्याले
सांधत गेले बांधत गेले . . . .७
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जीवन माझे शब्दची झाले
कवितेचे ते कोंदण ल्याले…
फारच सुंदर..
Congratulations aaisaheb….so nice and meaningful poem….
Very nice poem…. pallavi