श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ खोटे नाणे ☆
मी मोत्यांचे तुला चारले होते दाणे
तरी असे का तुझे वागणे उदासवाणे
काढायाला भांडण उकरुन तुलाच जमते
शोधत असते नवीन संधी नवे बहाणे
तूच बोलते टोचुन तरिही हसतो केवळ
किती दिवस मी असे हसावे केविलवाणे
अंगालाही लागत नाही बदाम काजू
मिळता संधी काढत असते माझे खाणे
नजर पारखी होती माझी नोटांवरती
तरी कसे हे नशिबी आले खोटे नाणे
हा तंबोरा मला लावता आला नाही
तरी अपेक्षा सुरात व्हावे माझे गाणे
राग लोभ तो हवा कशाला जवळी कायम
नव रागाचे गाऊ आता नवे तराणे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈