सुश्री उषा जनार्दन ढगे
कवितेचा उत्सव
☆ सण आला सौख्याचा… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
होतसे मराठी नववर्षारंभ
चैत्राच्या शुध्द प्रतिपदेस
शुभ दिन चैत्रपाडव्याचा
पहिला सण असे हा खास…
वस्र रेशमी कलश रुप्याचा
सजवूनी गुढी उभारली दारी
प्रतीक असे हे सुमांगल्याचे
चैतन्य सुख संपदा नांदे घरी…
रेखूनी रांगोळी प्रवेशद्वारी
स्वागतास तोरण सुशोभित
करावे सेवन कडुनिंब पानांचे
लाभे आरोग्य शरीर रोगमुक्त…
सुमंगल सांस्कृतिक समुचित
वैशिष्ट्यपूर्ण चैत्राचा हा मास
दिस गुढीपाडव्याचा मुहूर्त
योग्य असे सर्व शुभकार्यांस…
वसंत ऋतूची लागता चाहूल
आम्रवनी कूजन कोकिळेचे
धरती पानाफुलांनी सजते
आगमन होते वैपुल्यतेचे…
गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी
संपला राम सीतेचा वनवास
रघुवीरकृपेने जाऊनी विपदा
आपत्तीचा शीघ्र होवो र्हास…!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈