डॉ मेधा फणसळकर
कवितेचा उत्सव
☆ शब्दांच्या गावात… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
कधी वाटे मजला की
आपण शब्द बनावे
या ओठातून त्या ओठी
अलगद गिरकत जावे
कधी शिरावे निलआभाळी
पाऊसगाणे छेडित जावे
उडूनी जावे विहंगदेशी
कोकिळकंठी मधुर स्वरावे
हळूच उतरूनी नदीकिनारी
लाटांवरी झुलताना गावे
प्रकाशवाटा जिथ सांजवती
कातरसूर मारवा बनावे
अलवार शिरावे कवीच्या चित्ती
कविता होऊन बरसून जावे
असे होऊनी शब्दरुपापरी
शब्दांच्या गावात फिरावे
अर्थ निराळा शब्द शब्द जरी
गुपित मनीचे कविता व्हावे
जात पंथ ना धर्म तरीही
शब्दांचे या गीत बनावे
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈