श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ या अशा, निशब्द वेळी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
या अशा निशब्द वेळी, ये प्रिये जवळी जरा
माळू दे केसांत तुझिया, हा सुगंधी मोगरा ||धृ ||
त्या निळ्या डोहात दोघे, हरवुनी रंगून जाऊ,
प्रीतीची गाणी अनोख्या, लाजऱ्या छंदात गाऊ,
संभ्रमी पडता जुळावा, भावभोळा अंतरा ||१ ||
ओठ हे प्राजक्त देठी, सांग काही बोलले?
का रतीच्या पैंजणाचे घुंगरू झंकारले?
दिलरूबा छेडीत बसली, काय कोणी अप्सरा ||२||
चांदणे गाईल तेव्हा, गाऊं दे बागेसरी,
ऐकू दे तुझीया स्वरांची, जीवघेणी बांसरी,
स्पर्शता जुळतील तारा, धुंद वारा बावरा ||३||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈