श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ तांडव… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: बालानंद)

मात्रा: ८+६

कोसळली कडकड वीज

दूभंग मंदिरी देव

कळवळला दैवी टाहो

मर्मावर झाला घाव !

 

चांदणे क्षमेचे अंधुक

सूडाची पेटत ज्वाला

हे घाव घातले ज्यांनी

त्यांच्यास्तव हाती भाला !

 

सूडाचा पेटत वणवा

बेचिराख हिरवळ सारी

क्षणभरात झाली वाफ

ह्रदयीची झुळझुळ सारी !

 

नटराज सुडाचा उघडी

प्रलयंकर तिसरा डोळा

निखळले दिशांचे खांब

अढळातुन ढळला तारा !

 

सृजनाचे रचिले सरण

तिमिरात बुडविले तारे

रूपरंग रसगंधांची

कुलुपबंद केली दारे !

 

शमल्यावर तांडव सारे

सांबाचे काळिज हलले

अपराधी होते कोण

उद्ध्वस्त कुणाला केले !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments