श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 100 – उपेक्षा ☆
नका करू हो उपेक्षा
अशी गरीब जीवाची ।
मला सुद्धा मिळेल का
संधी शाळा शिकण्याची।
आहे कुरूप थोडीशी
असे मलीन कपडे ।
बुट टाय स्कूलबॅग
मला मुळीच न घडे।
वाढलेल्या झिपऱ्यांना
सदा वाण ती तेलाची
कशी लावावी संगत
वही आणि त्या पेनची।
रस्तोरस्ती गल्लोगल्ली
आम्ही भंगार वेचतो।
रस्त्यावर उकंड्यात
मीठ-मिरची शोधतो।
दिस रात राबूनिया
माय पुरती थकते।
रिती गाडगी-मडकी
तिची भूकच मरते।
तान्हा रडून घायाळ
ओढ दधुाच्या घोटाची।
फोल ठरती संस्कार
गार भरण्या पोटाची।
सारं पाहून बा माझा
पुरा अगतिक झाला
ऐन उमेदीत असा
आज मुकला जिवाला
जरी नसेल आधार
थोडं असंच शिके न ।
नको काही दसरे हो
थाप हवी कौतुकान।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈