कवितेचा उत्सव
☆ दिवाळी,तो आणि मी… ☆ अनंत काणेकर☆
दीपांनी दिपल्या दिशा !-सण असे आज हा दीपावली.
हर्षाने दुनिया प्रकाशित दिसे आतूनी बाहेरूनी !
अंगा चर्चुनि अत्तरे,भरजरी वस्त्रांस लेवूनिया,
चंद्रज्योति फटाकडे उडविती आबाल सारे जन.
पुष्पे खोवुनि केशपाशी करूनी शृंगारही मंगल,
भामा सुंदर या अशा प्रियजना स्नाना मुदे घालिती.
सृष्टी उल्हसिता बघूनि सगळी आनंदले मानस,
तो हौदावरी कोणासाठी मज दिसे स्नाना करी एकला;
माता,बंधु,बहीण कोणि नव्हते प्रेमी तया माणूस,
मी केले स्मित त्यास पाहूनि तदा तोही जरा हासला.
एखाद्या थडग्यावरी धवलशी पुष्पे फुलावी जशी,
तैसे हास्य मुखावरी विलसले त्या बापड्याच्या दिसे !
तो हासे परि मद्हृदी भडभडे,चित्ता जडे खिन्नता;
नाचो आणिक बागडो जग,नसे माझ्या जिवा शांतता !
– अनंत काणेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈