कवितेचा उत्सव
☆ अप्सरांचे गाणे … ☆ बालकवी ☆
सुमनाच्या गर्भामाजी/रसगंगा भरली ताजी//
आलिंगुनि तिज ही बसली/ शुभ्र अद्रिशिखरे सगळी//
सांभाळुनि उतरा बाई/वेळ गडे! स्नानाची ही//
गर्द दाट मधली झाडी/मंद मंद हलवा थोडी//
पराग सुमने इवलाली/नीट बघता पायांखाली/
पुष्पांचा बसला थाट/हळूं हळूं काढा वाट//
गोड सुवासांचे मेघ/आळसले जागोजाग//
जलकणिका त्यांच्या पडती/थंडगार अंगावरती//
स्नान करू झडकरि बाई/पुनित ही गंगामाई//
रवि किरणांचे नवरंगी /रम्य झगे घालुनि अंगी//
गुंजतसे मंजुळ गीते/बैसुनि त्या भृंगावरते//
रंगत मग जगती जाऊ/हसू रूसू गाणी गाऊ//
– बालकवी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈