सुश्री दीप्ती कुलकर्णी
☆ कवितेचा उत्सव ☆ हे अंबे ! जगदंबे ! ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
हे अंबे!जगदंबे!धाव घेई झडकरी
षड्रिपुचे महिष तूच, टाक गे विदारुनी
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर दाटले
छेद पटल दूर सार, रिपु भारी पातले
विश्वजननी आस तुझी, दाटली उरातुनी
अधीर मना धीर द, धाव पंचतत्वातुनी
तेज तूच, तूच आप, तूच वायु, तू धरा
व्यापिलेस व्योम सर्व, मम मनाच्या प्रांगणी
मी कन्या तव माते, अज्ञ आहे जाणुनी
तव क्रुपे बरसु दे, काव्यगंगा रोमातुनी
शक्तिदात्री, स्फूर्तीदात्री, करवीर निवासिनी
छत्र तुझे मज लाभो, प्रार्थिते मनोमनी.
© सुश्री दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈