श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ दुष्काळ नाही ☆
पावसावर झोडण्याचा आळ नाही
पंचनामा सांगतो दुष्काळ नाही
काळ हा नाठाळ आहे एवढा पण
मानले त्याला कधी जंजाळ नाही
गळत आहे छत बदलतो कैकदा मी
पण बदलता येत मज आभाळ नाही
शरद आला घेउनी थंडी अशी की
अग्निला मग शेक म्हणती जाळ नाही
मार्ग स्वर्गाचा मला ठाऊक होता
मी धरेवर शोधला पाताळ नाही
देउनी चकवा ससा निसटून गेला
पारध्याची आज शिजली डाळ नाही
मी मनाचे कोपरेही साफ केले
साचलेला आत आता गाळ नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈