कवितेचा उत्सव
☆ वट पौर्णिमा… ☆ डॉ. स्वाती पाटील ☆
कशाला हवेत सात जन्म,
या जन्मात च उत्सव करू जगण्याचा
एकमेकांसाठी असण्याचा,……
रुजू आपण पारंबी पारंबी त
विस्तारु प्रेमात अन् मुळांच्या रुपात,
एकमेकांची स्वतंत्र आस्तित्व जाणीव
जपु एकमेकांच्या परिघात,
असू आपण सदैव एकमेकांचे
जिव्हाळ्याच्या हळव्या क्षणांसाठी
आणि ठेवूया भान सहजीवनाचे
जपून एकमेकांची मने,
कशाला हवेत सात जन्म,
या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,
एकमेकांसाठी असण्याचा,
घे कधी कवेत मला तुझ्या
येते वेळ जेव्हा हरण्याची
मी ही देईन साथ आश्वासक
जागवू उर्मी पुन्हा जिंकण्याची,
येतील अवघड कोडयांच्या परीक्षा
हरवतील वाटा आणि संपतील आशा
होवु मूक दिलासा एकमेकांचा
मनाच्या संवेदनशील आर्त स्पंदनांचा,
कशाला हवेत सात जन्म,
या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,
एकमेकांसाठी असण्याचा,
आताशा होतात दगडी मने
गोठते माया होई काळीज मुके
आपल्यातला निर्झर खळाळता
ठेवूया शेवटापर्यंत वाहता,
येतील मोहाचे बेधुंद क्षण
आणि कातरवेळा फसव्या
सावरू निसरडा तोल एकमेकांचा
आधारवड होवू आपण एकमेकांचा, h..
कशास हवेत सात जन्म
या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,
एकमेकांसाठी असण्याचा
© डॉ.स्वाती पाटील
सांगली
मो. 9503628150
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈