श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ शुद्र माशा ☆
भांडताना राग झाला जर अनावर
टाकतो देऊन त्याला मी सुळावर
गोडधोडाला जरा झाकून ठेवू
शुद्र माशा नजर त्यांची तर गुळावर
ज्ञान गीतेचे दिले भाषेत सोप्या
केवढे उपकार ज्ञानाचे जगावर
एवढा ताणून धरला प्रश्न साधा
येत नाही अजुन गाडी ही रुळावर
काळजाचे कैक तुकडे तूच केले
तेच तुकडे प्रेम करती बघ तुझ्यावर
तिमिर आहे फक्त आता सोबतीला
चंद्र गेला डाग ठेउन काळजावर
कर्म संधी चल म्हणाली सोबतीने
ज्योतिष्याच्या राहिलो मी भरवशावर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈