श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मीच… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(पादाकुलक)

मी येशूही मीच क्रूसही

स्वये निवडला पथ अंताचा

देह छिन्न हा पाठीवरती

मीच वाहतो सतत स्वतःचा !

 

     मीच माझिया गरुडाचे रे

     पंख छाटले निर्दयतेने

     खणिले थडगे माझ्यासाठी

     त्यास पारखी करिता गगने !

 

स्वर्णयुगाचा झालो कैदी

कोठडीत अन् चिणला गेलो

वर्षांमागुन सरली वर्षे

आणि अखेरी जिवाश्म झालो !

 

     गृहीतकांची चकवाचकवी

     कधी जाहले उलटे अंबर

     द्रवला नाही घन आषाढी

     पण पाषाणा फुटला पाझर !

 

उंबऱ्यात ये रथ किरणांचा

स्वागतास नच द्वार उघडले

अंगणात मग रथचक्रांचे

ठसेच अंधुक केवळ उरले !

 

     अवेळ आली भरती कैसी

     परतिच्या या वाटेवरती

     मीच बुडविल्या माझ्या नौका

     पुन्हा तरंगत लाटांवरती !

 

कधि न पाहिले वळून मागे

त्या बेटाची हाक ये कानी

दुभंग आता नाविक नौका

झुंज परतिची केविलवाणी !

 

     मीच चढविले मला क्रुसावर

     व्यर्थ ज्युडासा तुझी फितुरी

     हौतात्म्याचे तरी दाटले

     धुके माझिया थडग्यावरती !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments