सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पन्हाळगड… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
सुंदर-सुंदर, रुप मनोहर
डोंगर-दर्या नि व्रुक्ष कलंदर
रस्ता हा सर्पिल वळणे बिलंदर
कडे-कपारी या भासती दुर्धर
पन्हाळा असा हा चित्तास वेधक
सांगू तरी किती स्थळाचं कौतुक
नरवीर बाजी नि जिवाचं बलिदान
मोरोपंतांच्या या आर्यांच गुणगान.
पाहावे तरुवर,वेली नि उद्यान
धान्याचं कोठार दरवाजा तीन
शिवराय स्पर्शानं, भूमी ही पावन
ताराराणींचा हा वाडा ही शान.
तटबंदी भक्कम,बुरुजांचा मान
गडाचं टोक ते भयावह. दारुण
गनिमी वाटा या यशासी कारण
आबालव्रुद्धांना खास आकर्षण.
थंड ही झुळुक, वात हा शीतल
शहारे तनमन,बनते ओढाळ
फुलांचा सुगंध,दरवळे परिमळ
धुके हे दाटते,वेढत स्थळ.
गडात गड हा पन्हाळा छान
शिवराय स्मृतींचे सोनेरी पान
मराठी मनाला सार्थ अभिमान
नतमस्तक होऊन राखावा मान.
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈