श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 109 – गर्दीच फार झाली ☆
देशात दानवांची गर्दीच फार झाली।
मदतीस धावण्याची वृत्ती फरार झाली।
शेतात राबणारा राही सदा उपाशी।
फाशीच जीवनावर त्याच्या उदार झाली।।
सारे दलाल झाले सत्तेतले पुढारी।
जनसेवकास येथे नक्कीच हार झाली।।
भोगी बरेच ठरता निस्सीम राज योगी।
भक्तांस वाटणारी श्रद्धाच ठार झाली।।
जाळून जीव आई मोठे करी मुलांना ।
आई कशी मुलांच्या जीवास भार झाली।।
बापू नकाच येऊ परतून या घडीला।
तत्त्वेच आज तुमची सारी पसार झाली।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈