प्रा. तुकाराम दादा पाटील
☆ काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील ☆
कवी सुहास पंडित यानी आपल्या या कवितेत भक्तीरस मोठ्या श्रद्धेने आळवला आहे. जीला आपण मधुराभक्ती म्हणून ओळखतो तिची आठवण ही कविता वाचताना येते.स्री सुलभ मनाला परमेश्वराची आठवत कशी येते हे सांगताना कवी म्हणतात.
कवी सुहास रघुनाथ पंडित
जेव्हा माझ्या कानावर बासरीची धून येते तेव्हा मला मनमोहन बन्सीधराची प्राकर्शाने आठवण येते. आता धोधो बरसणा-या आषाढधारा सरल्या आहेत आणि श्रावण मासातील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे.अशा वेळी माझ्या मनाला भुरळ पाडणारे आवचितच भास का होत आहेत? माझे मन हुरहुरते आहे. पण माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली असून माझ्या डोळ्याना मला जिथे तिथे माझा श्रीनीवासच दिसतो आहे. त्याचाच मला सारखा भास होतो आहे. येथे व्यक्त होणारे हळवे कवी मन फुललेल्या रमणीय निसर्गातच परमेश्वराचे दर्शन घेत आहे असे वाटते. पण तेवढ्यावरच न थांबता ते मन पुढे म्हणते मला प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप पहावयाचे आहे. मी डोळ्यात जीव आणून त्या विधात्याची वाट पहात आहे. जीवाला जीव लावून जायची देवाची लाघवी जुनी सवय मला माहित आहे. म्हणूनच माझे मन त्याच्या दर्शनासाठी व्याकूळ झाले आहे. या माझ्या आशाळभूत मनावर कोण बरे मायेची फुंकर घालायला येईल?. मी देवाच्या ध्यासाने ठार वेडी झाले आहे असे सारे जगच मला म्हणते आहे.
त्याचे प्रत्यक्ष असे रूप माझ्या नजरे समोर नाही. पण तरीही त्याच्या कल्पक स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माझी वाणी अपुरीच आहे असे मला वाटते. माझ्या आयुष्यात आसा एखादा सोन्याचा दिवस यावा आणि देवाचे प्रत्यक्ष दर्शन मिळून माझ्या जगण्याचे सार्थक व्हावे.
येथे आता राधा नाही. सखा सुदामा नाही.पण माझे मन त्यांच्या दर्शनासाठी आणि सहवासासाठी उतावीळ झाले आहे. त्या माझ्या मनाला मी कसा लगाम घालू? माझा हा मनोदय मी माझ्या देवाला आता कोणत्या भाषेत सांगू?
माझ्या हृदयात दाटलेल्या आवेगपूर्ण भावना व्यक्त करणारी भाषा माझ्या ओठावर येइनाशी झाली आहे. आकाशात दाटलेले हे शामवर्णी मेघ ही मला स्वस्थ पणे जागू देइनासे झाले आहेत. म्हणून मी आता या वनातील पानापानात व त्यांच्या हरित रंगात दडून बसलेला हरी पहातो आहे.मला आता माझा हरी तेथेच दिसतो आहे.भेटतो आहे.
मनाच्या आभासी संभ्रमावस्थेत निसर्गात समाविष्ट झालेला हरी पाहताना होणारा मनमुराद आनंद निसर्गाचे दिव्यत्व दाखवतो. पण तेथेच परमेश्वर पहाणे ही मानवी श्रद्धा बनायला पाहिजे हेच या कवितेतून कविला सांगायचे आहे असे मला वाटते. निसर्गाच्या या सामर्थ्याची आपल्याला ओळख पटली तर मग आपला स्वर्ग आपल्याच भोवती असेल. आणि तोच आपला तारणहार परमेश्वर असेल. दिलेल्या या संदेशाला प्रतिसाद देवून आपण एक नवी दृष्टी प्राप्त करून घेऊ आणि सूखीही होऊ. या संदेशाला साठी कवीचे आभार. कविता दीर्घ आहे पण वाचनीय आहे.
धन्यवाद
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈