श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

जिना

कळले आता घराघरातून

नागमोडीचा जिना कशाला

एक लाडके नाव ठेवुनी

हळूच जवळी ओढायला

जिना असावा अरुंद थोडा

चढण असावी अंमळ अवघड

कळूनही नच जिथे कळावी

अंधारातील अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायऱ्या

कठडाही सोशिक असावा

अंगलगीच्या आधारास्तव

चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची

वसुली अपुली द्यावी घ्यावी

मात्र छतातच सोय पाहुनी

चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा

कधी न कळावी त्याला चोरी

जिना असावा मित्र इमानी

कधी न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतो-स्वर्गाच्याही

सोपानाला वळण असावे

पृथ्वीवरल्या आठवणीनी

वळणावळणावरी हसावे

          – वसंत बापट

‘जिना’ या एका साध्या शब्दावरचे कवी वसंत बापट यांचे काव्य वाचताना कवी केशवसुत यांच्या,’ साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ‘ या ओळींची आठवण होते.एक मजल्यापेक्षा अधिक मजल्यांच्या घराने जिना निर्माण केला आणि तो कवितेचा विषय बनला.

ही कविता लिहिताना पहिल्याच कडव्यात कविने जिनाच्या बारशाची तयारी दाखवली आहे.आपल्या घरातल्या जिन्याला आपण आपलं आवडत नाव ठेवावं .त्या नावाचे स्मरण होताच जिन्यात जाऊन बसावयासाठीच  त्या नावाची गरज !प्रत्येक घराला जिना असावा असे कवीला वाटते. हा जिना नागमोडी वळणाचा असावा कारण असे वळण घेताना लहानपणापासून सर्वांना वेगळे वाटते. वळणातला वेगळेपणा वर्णन न करता येण्यासारखा असतो. जिना सावकाशपणे चढता यावा,जातायेता कुणीतरी धक्का द्यावा अशी ही कल्पना, जिना अरुंद असावा असा विचार करणाऱ्या कविच्या मनात असावी. तो थोडा अवघड असावा म्हणजे जिना चढताना बसता येते,जिन्याशी बोलता येते. जिन्यातला अंधारही कविला हवासा वाटतो.अंधारात धडपडत चालणे हे सर्व कविच्या मनाला गुदगुल्या, करणाऱ्या गोष्टी वाटतात.

कधी कधी कविता पायरीवर एकांतात बसून हितगुज करावेसे वाटणे कवीच्या,’ मुक्या पायऱ्या’ या शब्दातून व्यक्त होते.जिना चढताना पडणे,खरचटणे आपल्याला सहन करावे लागते पण लोकांचे हे वागणे  सोशिक जिना सहन करतो अशी कवी कल्पना आहे.जिन्याच्या वळणावळणाच्या जिन्यावर चालणारी गुप्त चर्चा, देवाण घेवाण, लाडिक बळजोरी बरोबर नाही असे वाटून जिन्यावरच्या छतावर आडोशाला बसलेली पाल चुकचुकत असावी,तिचे ते चुकचुकणेही गरजेची मानणारा कवि वळणाला  महत्त्व देतो. जिन्याला आंधळा म्हणतो.

 जिना प्रकारात कविला ‘ स्वर्ग सोपान’ अधिक आवडतो कारण स्वर्गात पटकन जाता येत नाही.कवितेच्या या विचारात कुंतीच्या गजगौरी व्रत उद्यापनासाठी स्वर्गातला हत्ती आणण्याकरिता अर्जुनाने तयार केलेल्या बाणांच्या जिन्याची आठवण होते

वसंत बापटांची अतिशय सुंदर अशी ही कविता आयुष्यातील चढ उतारांचे रूपक ठरावी अशी आहे.जिन्याचे वर्णन करताना कविनी वापरलेले शब्द आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारे वाटतात.

आजच्या फ्लॅटसिस्टिमच्या जमान्यात लिफ्टचा वापर करणारे या कवितेतील शब्दानंदाना नक्कीच मुकतील.

आयुष्याचे चढउतार  समजण्यासाठी जिना हवा आणि तोही कवि श्री. वसंत बापट यानी आपल्या कवितेत रंगविल्याप्रमाणेच असावा.एक अप्रतिम कविता असे या कवितेचे वर्णन करता येईल.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments