सौ राधिका भांडारकर

 

? काव्यानंद ?

 ☆ खेळाचा चक्कर भवरा… डॉ सरोजिनी बाबर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ काव्यानंद ☆

वीस एप्रिल हा डॉक्टर सरोजिनी बाबर, लेखिका, लोकसाहित्यिका, कवयित्री, बालगीतकार यांचा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने:

 खेळाचा चक्कर भवरा…

नदीच्या तासात वाळूच्या जोषात

कहार उन्हात कामाला उपस्थित

आळवावा सारंग धरा

हासर्‍या नजरेनं  खुशीच्या बोलीनं

फुलवाव्या येरझारा

गर्जू दे नभाला

नाचू दे वीजेला

सोडीत अमृतधारा

करा रे हाकारा

पिटा रे डांगोरा

खेळाचा चक्कर भवरा…

☆ रसग्रहण ☆

जुन १९७३ साली मान्यवर कवयित्री सरोजिनी बाबर यांनी लिहिलेली ही सुंदर, आशयघन, मानव आणि निसर्ग यांच्या नात्यावरची ही कविता.

ही कविता वाचताना सहज लक्षात येतं की, या कवितेत एक आळवणी आहे. पाऊस म्हणजे जीवन. या पर्जन्य धारांची सारं चराचर आतुरतेनं वाट पहात असतं.

जसं बळीराजाचं जीवन त्यावर अवलंबून असतं तसंच, जीवलोकांत अनेकांचं असतं. त्यातलाच एक सारंगधर.

एक नावाडी. खलाशी. किंवा नदीच्या पात्रांत, समुद्राच्या ऊदरात मच्छीमारी करणारा कोळी.

मग या पावसाची ही भक्तीभावाने ,हसर्‍या नजरेनं, खुशीच्या स्वरात केलेली एक आर्त अशी विनवणी या कवितेत जाणवते. पावसाच्या आगमनासाठी केलेली प्रयत्नपूर्वक, कष्टमय तयारीही आहे. मग पाऊस येणार आहे, आकाश गडगडणार आहे, वीजा चमकणार आहेत, आणि मग  अमृतमय पर्जन्यधारा कोसळणार आहेत.. हा आनंदीआनंद होत असताना, एका नादमय हर्षकल्लोळात एक चक्कर भवरा म्हणजे मन गिरक्या घेणार आहे.

कवयित्रीने अतिशय आनंदमयी शब्दांतून सारंगाशी हा स्फूर्तीदायी संवाद साधला आहे.

सारंग या शब्दाचा संगीतातील एका रागाशीही संबंध आहे.

हा एक मधुर सुरावटीचा राग असून,  त्याच्या आळवणीने, ऊष्म प्रहरात शीतलतेचाही अनुभव येतो.कवयित्री सरोजिनी ताईंनी आळवावा सारंगधरा याअर्थानेही म्हटले असावे.

आणखी एक अर्थ असाही जाणवतो. की सारंग म्हणजे शीव. शीवाची आळवणी म्हणजेही पर्जन्यदेवतेचीच आराधना.

मात्र या संपूर्ण काव्यरचनेला एक नाद आहे. लय आहे. गती आहे. वेग आहे. आणि शब्दाशब्दांत चैतन्य ठासून भरलेलं आहे. या काव्यशब्दांबरोबर संवेदनशील मन या आनंदरसात किंवा या हर्षलाटेत डुंबून जाते.. एक शीतल, ओलाव्याचा अनुभव येतो.

सारंगधरा, येरझारा, अमृतधारा, हाकारा, डांगोरा भवरा या यमकीय शब्दांमधला वेग  नाद आणि लय इतकी सुंदर आहे की ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते गावीशी वाटते.

मूळातच डाॅ.सरोजिनी बाबर हे एक लोकव्यक्तीमत्व होतं.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर केला. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समीतीच्या त्या अध्यक्ष होत्या. दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य

त्यांनी संकलीत केल. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या, लोकवाङमयाचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला. त्यात कोळ्यांची गीते, कथा, कहाण्या, म्हणी, ऊखाणे, सण ऊत्सव, रितीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.

अर्थातच, त्यांच्या लेखनावर, काव्य रचनेवर लोकसंस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि निसर्गाचा प्रभाव जाणवतो.

ऊपरोक्त, नदीच्या तासात वाळूच्या जोषात.. ही कविताही लोकसाहित्याच्याच अनूषंगाने जाणारी आहे.

त्यातले, कहार, हाकारा, डांगोरा, चक्कर भवरा हे बोलीभाषेतले शब्द वेगळ्याच माधुर्याने लिंपलेले आहेत.

या कवितेतला सारंगधर हा कष्टकरी वर्गातला, निसर्गाशी बांधलेला प्रतिनिधी आहे. आणि सरोजिनीताई काव्यातून त्याच्या जीवनाशी सहजपणे समरस होतात. हेच या काव्याचे वैशिष्ट्य.

अडगुळं मडगुळं

सोन्याचं कडबुळं

खेळायला आलं ग

लाडाचं डबुलं

जावळात भुरभुरलं

नजरेत खुदखुदलं

सोन्याच्या ढीगाव

बाळ गं बैसलं..

हे त्यांचं बडबडगीत घराघरातली माता आपल्या तान्हुल्या साठी गाते.

त्यांच्या झोळणा, चाफेकळी या काव्य संग्रहातील कविता वेगळ्या का वाटतात? कारण ते शब्दालंकारच जीवनाला भिडणार्‍या संस्कृतीतले आहेत. त्यात अपार आपलेपणा आहे. त्यातल्या भावना नैसर्गिक आहेत. त्या चटकन् भिडतात.

‘माझ्या खुणा माझ्या मला’ .. हे आत्मचरित्रही त्यांनी लिहीलं.

दूरचित्रवाणीवर, रानजाई या कार्यक्रमातून, कवीश्रेष्ठ शांताबाई शेळके यांच्याशी केलेल्या गप्पा प्रचंड गाजल्या.

जाता जाता, सहज एक लोकभाषेतला, या कार्यक्रमातला गंमतीदार किस्सा आठवला तो सांगते.

कुणीतरी घरातल्या कारभारणीला विचारतात,

“का वं मालक हायत का घरला? “

कारभारीण उत्तरते, ” काय की हो..खुंटीवरचं मुंडासं दिसं नाय मला…”

याचा अर्थ मी ऊलगडवून सांगायला नको. त्यातली गंमत तुम्हीच अनुभवावी..

तर असं हे विलक्षण सरोजिनी बाबर नावाचं विलक्षण लोकव्यक्तीमत्व!त्यांनी पाचशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. बळीराजा, जा माझ्या माहेरा, कुलदैवत, कारागिरी,एक होता राजा या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या.

एक गोष्ट खेदपूर्वक आणि जाणीवपूर्वक नमूद करावीशी वाटते की पुस्तकांसाठी खास प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या आप्पा बळवंत चौक इथल्या एकाही दुकानात ,डाॅ. सरोजिनी बाबर यांचं साहित्य उपलब्ध नाही. त्यांचं पुनर् मुद्रण व्हावं ही अपेक्षा ठेवून या थोर व्यक्तीमत्वाला आजच्या स्मृतीदिनी मी सादर वंदन करते…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments