सुश्री सीमा पाटील (मनप्रीत)

अल्प परिचय 

सीमा ह.पाटील. (मनप्रीत)

शिक्षण – M.com. D.ed.

सम्प्रति – पंधरा वर्षे हायस्कुल शिक्षिका.

सध्या प्रायव्हेट ट्युशन 10th पर्यंत आणि एकयशस्वी  उद्योजिका.

आवड-  नाटकपाहणे,भावगीतांचे, सुगम संगीताचे कार्यक्रम एन्जॉय करणे. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे.वाचन,भावलेल्या प्रसंगावर लिखाण, कथा लेखन , कविता लेखन , चारोळ्या लेखन .अनेक लेखन स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम केले आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते ‘प्रीतिसरी ‘ हा  चारोळी संग्रह  प्रकाशीत झाला आहे. थोड्याच दिवसात काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे. सभोवतालचा परिसर ‘या सदरांतर्गत महाराष्टातील अनेक किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

 सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. विविध महिला ग्रुप मध्ये सक्रिय. तसेच  राजकीय  सक्रिय सहभाग.

अलीकडे ‘गझल’ हा लिखाणाचा अतिशय सुंदर आणि माझा आवडता प्रकार शिकत आहेत.

? काव्यानंद ?

 ☆ मैत्रिण…कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

कै. शांता शेळके

मैत्रिण – 

स्वप्नातल्या माझ्या सखी

कोणते तुझे गाव?

कसे तुझे रंगरुप

काय तुझे नाव?

 

कशी तुझी रितभात?

कोणती तुझी वाणी?

कसे तुझ्या देशामधले

जमीन, आभाळ, पाणी?

 

लव्ह्याळ्याच्या मुळांतून

झिरपताना पाणी

त्यात पावले बुडवून तू ही

गुणगुणतेस का गाणी?

 

सुगंधित झुळका चार

केसांमध्ये खोवून

तू ही बसतेस ऊन कोवळे

अंगावर घेऊन?

 

काजळकाळ्या ढगांवर

अचल लावून दृष्टी

तू ही कधी आतल्याआत

खूप होतेस कष्टी?

 

कुठेतरी खचित खचित

आहे सारे खास,

कुठेतरी आहेस तू ही

नाही नुसता भास.

  • शांता शेळके

☆ रसग्रहण ☆

आज खूप सुंदर आणि हळवे भाव व्यक्त करणारी जेष्ठ कवयित्री शांता यांची ‘मैत्रीण ‘एक अप्रतिम  कविता !सादर केली आहे.

 स्वप्नातल्या माझ्या सखी

 कोणते तुझे गाव?

 कसे तुझे रंगरुप

 काय तुझे नाव?

कवयित्री स्वप्नातल्या आपल्या सखीशी संवाद साधत असताना अगदी अनोळखीपणे विचारत आहेत, अग सखी तुझे गाव कोणते? तू दिसतेस कशी? आणि तुझे नाव काय?

म्हणजेच कधी कधी आपल्या स्वतः मधीलच काही वैशिष्ट्ये आपणास वेगळी वाटू लागतात. आणि याच वैशिष्ट्यांना आपण असे प्रश्न विचारतो म्हणजेच आपण एखादे आपले मत मांडत असू तेव्हा किंवा जेव्हा आपण एखादी भूमिका पार पाडत असतो किंवा तेव्हा त्याबद्दल आपण जर साशंक असू अशा वेळी द्विधा मनस्थिती  बद्दल आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारत आहोत असं काहीसं या ओळीतून कवयित्रीला सांगावेसे वाटते असे वाटते.

 कशी तुझी रितभात?

 कोणती तुझी वाणी?

 कसे तुझ्या देशामधले

 जमीन,आभाळ, पाणी?

 लव्ह्याळ्याच्या मुळांतून

 झिरपताना पाणी

 त्यात पावले बुडवून तू ही

 गुणगुणतेस का गाणी?

वरील कवितेतून कवयित्री आपल्या मनात लपलेल्या सखीच्या कानात हळूच प्रश्न विचारत आहे माझी जी व्यक्त होण्याची पद्धत आहे तीच तुझी स्वतःची आहे का? की काही वेगळ्या परंपरा, रूढी यांच्या प्रभावाखाली येऊन तू काही निर्णय घेत तर नाहीस ना?

तू जे काही वर्तन करतेस त्यातून तुला नक्कीच आनंद मिळत आहे ना? असं कवयित्री अगदी हळव्या भावनेसह गुणगुणतेस ना गाणी अशा सुंदर शब्दांत विचारत आहेत.

 काजळकाळ्या ढगांवर

 अचल लावून दृष्टी

 तू ही कधी आतल्याआत

 खूप होतेस कष्टी?

 कुठेतरी खचित खचित

 आहे सारे खास,

 कुठेतरी आहेस तू ही

 नाही नुसता भास.

वरील ओळी मधून कवयित्री शांता शेळके यांनी जीवन जगत असताना प्रत्येक स्त्री च्या मनाची तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतानाही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करून नाईलाजाने गप्प बसावे लागते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते तिचे अगदी भावस्पर्शी वर्णन वरील कवितेतील कडव्या मधून केले आहे त्या म्हणतात पाण्याने गच्च भरलेल्या कृष्ण ढगासारखी म्हणजेच पापणी आड सजलेल्या अश्रू ना बाहेर न येऊ देता अगदी प्रयासाने तू ते थांबवतेस ना, हो अगदी नक्की मी तुला अगदी जवळून ओळखते, कारण मी तुझी जिवलग सखी ना?

म्हणजेच प्रत्येक स्त्री च्या मनात एखाद्या दुःखी प्रसंगी लपलेल्या एका असहाय्य  भावनेची समजूत काढताना कवयित्री इथे दिसत आहेत !!

© सीमा पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments