डॉ निशिकांत श्रोत्री
काव्यानंद
☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆
☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆
कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे
मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे ||ध्रु||
स्थावर-जंगम तेही सोडा देह नसे आपुला
क्षणभंगुर तो मिथ्या तरीही मोह उगा ठेविला
आत्म्याचे अस्तित्व चिरंतन अंतरी जाणावे
कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||१||
आयुष्यातिल खस्ता आणिक कष्टा ज्या भोगले
फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले
सेवा हाची धर्म जाणुनी माझे नाही म्हणावे
कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||२||
काय अपुले काय नसे हे अता तरी उमगावे
मोह वासना त्यात गुंतुनी घुटमळुनी का ऱ्हावे
मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारुनी द्यावे
कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||३||
सहा रिपूंच्या फेऱ्यामध्ये सदैव भिरभिरणे
नसणे अन् नाहीसे होणे यात चिमटुनी जगणे
आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे
कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||४||
©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४
☆ निरोप – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆
निरोप : विरक्तिपर विचारांची भावमधुर कविता – अमिता कर्णिक-पाटणकर
सिद्धहस्त साहित्यिक-कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची ‘ निरोप ‘ ही कविता वाचली व प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलीही. तेव्हापासून एका नितांतसुंदर काव्याचा आनंद अनुभवते आहे.
कवितेची सुरुवातच ” कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे, मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे” ह्या निरोपाच्या ओळींनी होते. हा निरोप इहलोकाचा आहे हे लख्खपणे सामोरे येते आणि थोडी उदासी, थोडी विषण्णता जाणवण्याच्या अपेक्षेने आपण पुढे वाचू लागतो. कविता सहजपणे उलगडत जाते ती अशाच निवृत्तिपर शब्दांनी. या जगातून निघून जाण्याआधीची नितळ आणि निखळ मनोऽवस्था पारदर्शी दिसते.
स्थावर- जंगम संपत्ती तर सोडाच, हा देहही आपल्या मालकीचा नाही; मग त्याचा मोह कशासाठी धरावा हा मूलभूत प्रश्नच कवी विचारतो. ” फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले ” ही ओळ तर गीतेच्या निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञानच! आयुष्य जसे समोर आले तसे जगण्याचे, कष्ट-हालअपेष्टा सहन करण्याचे बळच ह्या मनोवृत्तीतून मिळाले असणार. म्हणूनच ‘ इदं न मम ‘ – ” माझे ‘नाही’ म्हणावे ” असे कवी सहजगत्या म्हणतो. जीवन क्षणभंगुर आहे हे एकदा आकळले की मग त्यातील भावभावना, कामनावासना व्यर्थ वाटू लागतात. मग ” मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारून द्यावे ” अशी जणू जीवाला ओढ लागते. अंतिम चरणातही बंदिस्त आयुष्याची घुसमट कवी मांडतो पण शेवटच्या ओळीत मात्र कविता वळण घेते – “आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे ” असे म्हणत एक वेगळीच उंची गाठते. आणि हेच या कवितेचे सार आहे.
जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांना जोडणारा पथ म्हणजे जीवन. या पथावर अनेक खाचाखळगे असतात तसेच सुखद थांबेही असतात. हे सर्व भोगत आणि उपभोगत मार्गक्रमण करायचे असते. हा मार्ग शेवटच्या मुक्कामाकडेच जातो हे अटळ सत्य सर्वांनाच पचवता येत नाही. मृत्यू हा दुःखद अंत आहे हीच भावना प्रायशः असते. इथेच डॉ. श्रोत्रींचं वेगळेपण जाणवतं. कवितेत कुठेच भय दिसत नाही, संध्याछाया ह्रदयाला भिववत नाहीत, दुःखाचे उमाळे फुटत नाहीत. उलट, विरागी योग्यांची अनासक्ती, तृप्तीच जाणवते. हे अजिबात सोपं नाही. वास्तविक साधूसंतांची हीच शिकवण आहे, पण सर्वसामान्य जनांना आचरणात आणणं अवघड वाटतं. डॉ. श्रोत्रींनी मात्र हे सहज अंगीकारलं आहे असं कवितेत ठायी ठायी दिसून येतं.
आयुष्यात सुखदुःखांना सोबत घेऊनच मार्ग चालावा लागतो. पण या मार्गावर एक एक ओझं उतरवत, विरक्त होत होत पुढे चालत राहिलं तर पैलतीर दिसू लागल्यावर आपण मुक्त, निर्विकल्प होऊन ‘निरोपा’साठी मनोमन तयार असतो. आपला नश्वर देह मागे सोडावा लागला तरी खरा साथी ‘ आत्मा ‘ चिरंतन आहे, अमर्त्य आहे हा दिलासा मिळाल्यावर भीतीला वावच उरत नाही. अविनाशी आत्म्याचा हा अनंताचा प्रवास निरंतर चालूच राहतो. तो संपत आल्यासारखा वाटला तरी खऱ्या अर्थाने कधी संपणार नसतोच….तो केवळ एक निरोप असतो – पुन्हा भेटण्यासाठी घेतलेला निरोप!
ऐहिक जीवनाचं वैय्यर्थ दाखवूनही सकारात्मक विचार मांडणारी ‘निरोप’ ही कविवर्य डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता म्हणूनच मला अतिशय उदात्त आणि उत्कट वाटली!
© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर
९९२०४३३२८४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
निरोप ही डॉ, निशिकांत श्रोत्री यांची कविता अतिशय भावली, जीवन हे एक अजब कोडं आहे त्याची उत्तर आपण फक्त शोधत राहतो , जीवन अंतापर्यंत,पण खुप प्रयत्नाने कवीला ती सापडली आहेत असे वाटते कारण मृत्यू हे एक अटळ सत्य आहे पण ते मान्य करायचे धाडस फार कमी लोक करतात, आणि जीवन अवघड करतात, पण कवी मात्र हे सर्व स्वीकारताना दिसत आहे आणि जीवनात येणाऱ्या सुख दुःखाशी एक नातं निर्माण करत आहे, आयुष्याचा कवीचा हा निरोप मन हळवं करून जातो
इतक्या सछोल सुजाण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार, दीपाली.
धन्यवाद सर
या कवितेचे रसग्रहण ही अमिता ताईंनी उत्तम प्रकारे केले आहे , त्यातील भावभावना अतिशय तरळतेने मांडल्या आहेत, त्यांची लेखणी अतिशय भारदस्त आहे धन्यवाद