श्रीमती उज्ज्वला केळकर
काव्यानंद
☆ कर्ण… शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सुश्री शोभना आगाशे
अल्प परिचय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एस व एम डी (पॅथाॅलाॅजी) या पदव्या प्राप्त. त्याच महाविद्यालयात २००७ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत. सन १९६८-६९ मधे आकाशवाणी सांगलीच्या महाविद्यालयीन कविसंमेलनात सहभाग. ‘सावळ्या’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. टागोर रचित इंग्लिश ‘गीतांजली’ चा काव्यानुवाद ‘गीतांजली जशी भावली तशी’ प्रकाशित.
☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆
हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।
जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।
तुमच्या तेजाचा अंश मी सतत वागवला काळजात।
त्या दिव्य तेजाने दिपले लोक, पण मी जळत राहिलो अंतरात।।
गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले।
आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले।।
हे भास्करा, तुम्हाला माझ्यावरचा अन्याय पाहून काय वाटले?
परोपकार करताना मी धरणीमातेला अनावधानाने सतावलं।
तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं।।
हे हिरण्यगर्भा तुम्हाला हे योग्य का वाटलं?
‘रथहीन, शस्त्रहीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना।
कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?।।
भर राजसभेत द्रौपदीनं माला सूतपुत्र म्हणून हिणवलं।
परशुरामाचा शिष्य असूनही त्यांच्या धनुष्यापासून दूर ठेवलं।।
हे आदित्या, त्यावेळीही माझ्या मदतीला कोणी नाही धावलं।
मला निस्तेज करण्यासाठी इंद्राने माझी कवचकुंडलं नेली।
पुत्रप्रेमापोटी त्याने भृंग होऊन माझी जंघा पोखरली।।
हे पुष्कराक्षा, तुम्हाला कधीच का पुत्रप्रेमाची अनुभूती नाही आली ?
‘ज्या मातृप्रेमासाठी माझी कुडी होती आसुसली।
त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली।।
सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।
द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ।।
जाताना अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली।
हे विवस्वता, त्यावेळी तुम्हालाही ती खरी का वाटली?।।
ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता।
माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता?।।
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच।
या प्रश्नांच्या जंजाळातून मला-माझ्या
आत्म्याला मुक्त व्हायचं आहे।।
‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,
हे धरित्री, हे मधुसूदना।
मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे।।
आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,
हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे।।
– सुश्री शोभना आगाशे, मो. 9850228658
☆ काव्यानंद – कर्ण….सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने अनेक साहित्यिकांना भुरळ घातली आहे. आपल्याला उमजलेले कर्णाचे व्यक्तिमत्व, त्यांनी कथा, कविता, लेख, कादंबरी यातून उलगडून दाखवले आहे. शोभना आगाशे यांनाही कर्णाच्या जीवन प्रवासाने व्यथित केले आहे. ‘कर्ण’ या कवितेत त्यांनी त्याबद्दलचे विचार, चिंतन कर्णाच्या मनोगतातून प्रगट केले आहे. कर्ण तेजस्वी. पराक्रमी. दानशूर. मृत्यूपासून दूर ठेवणारी कवच-कुंडले घेऊन जन्माला आलेला. तरीही त्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात. का? असं का? सूतपुत्र म्हणून त्याला वारंवार अपमानित व्हावं लागतं. कवितेत तो आपल्या पित्याला सूर्याला प्रश्न विचारतोय,
तो म्हणतो, ‘ हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।
जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।’ कुंतीचं मातृत्व स्वार्थी होतं. मातृप्रेमासाठी त्याचा जीव आसुसलेला होता. पण ती त्याला केव्हा भेटली? तर कौरव-पांडव युद्धाच्या वेळी. आपल्या मुलांना विशेषत: अर्जुनाला त्याच्याकडून धोका प्राप्त होऊ नये म्हणून. म्हणूनच तो तिचं मातृत्व स्वार्थी आहे, असं म्हणतो. त्याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी ती सम्राटपदाची, द्रौपदीची लालूच दाखवते. कर्ण म्हणतो,
‘ज्या मातृप्रेमासाठी माझी कुडी होती आसुसली
त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली.
सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।
द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ‘
‘जाता जाता ती अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली.’ कर्णाला प्रश्न पडतो,
ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता
माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता.?’
इथे सूर्याची वेगवेगळी नावे प्रत्येक वेगळ्या ओळीत आली आहेत. भास्करा, हिरण्यगर्भा, आदित्या, पुष्कराक्षा, विवस्वता अशी संबोधने कवयत्रीने सूर्याबद्दल वापरली आहेत.
कर्ण म्हणतो, ‘गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले
आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले.’ या ओळींमागे एक संदर्भकथा आहे. ही संदर्भकथा बहुतेकांना माहीत आहे. कर्णाला परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायची होती. फक्त ब्राम्हणांनाच धनुर्विद्या देणार, हा परशुरामांचा पण. आपण ब्राम्हण आहोत, असं खोटंच सांगून कर्ण परशुरामांकडे धनुर्विद्या शिकतो. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्राम करत होते. यावेळी इंद्राने भृंग होऊन कर्णाची जंघा पोखरायला सुरुवात केली. कर्णाला खूप वेदना झाल्या. मांडीतून रक्त वाहू लागले पण गुरूंच्या विश्रामात व्यत्यय नको म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही. शेवटी रक्ताचा ओघळ मानेखाली जाऊन परशुरामाला जाग आली. एखादा ब्राम्हण हे सारं सहन करू शकणार नाही, याबद्दल परशुरामाची खात्री. त्याने खोदून खोदून विचारल्यावर कर्णाला आपण सूतपुत्र असल्याचे कबूल करावे लागले. परशुराम यावेळी त्याला शाप देतो, ‘ऐन युद्धात तुला शिकवलेले मंत्र आठवणार नाहीत.’ ही कथा आठवताना मनात येतं, कर्ण खोटं बोलला हे खरे? पण का? त्या मागची त्याची ज्ञाननिष्ठा परशुरामाला का नाही जाणवली? परशुरामाला जाग येऊ नये, म्हणून त्याने सोसलेल्या वेदनांचे, त्याच्या गुरुनिष्ठेचे मोल काहीच का नव्हते?
कर्ण पुढे म्हणतो, ‘परोपकार करताना मी धारणीमातेला अनावधानाने सतावलं
तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं. ‘ हा संदर्भ मात्र फारसा कुणाला माहीत नाही. एकदा कर्ण आपल्या राज्यातून फिरत असताना त्याला एक मुलगी रडताना दिसली. त्याने कारण विचारलं असता ती म्हणते की तिच्याकडून मातीचं भांडं पडलं. त्यात तूप होतं. ते आईला कळलं, तर आई रागावणार, म्हणून ती रडत होती. कर्ण म्हणाला, तुला नवीन तुपाचे भांडे घेऊन देतो, पण तिने हट्ट धरला, तिला जमिनीवर पडलेले तूपच हवे आहे. कर्णाला तिची दया आली. त्याने स्वत:च्या हाताने मातीत पडलेले तूप उचलले. ती माती हातात घेऊन, पिळून त्यातून तूप काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातातून एका बाईचा आवाज आला. ती धरणीमाता होती. ती म्हणाली, ‘या मुलीसाठी तू माझी पिळवणूक करीत आहेस.’ आणि तिने कर्णाला शाप दिला की युद्धाच्या वेळी ती त्याच्या रथाचे चाक पकडून ठेवेल आणि त्यामुळे शत्रू त्याच्यावर सहज हल्ला करू शकेल.
या प्रसंगी कर्णाने दाखवलेली माणुसकी, परोपकाराची भावना धारणीमातेला नाही का जाणवली?
कवयत्रीने इथे कुठेही तपशिलाचा फापटपसारा मांडला नाही. एक-दोन ओळी लिहून त्यातून घटिताचा संदर्भ सुचवला आहे.
कर्ण प्रश्न विचारतो, ‘रथहीन, शास्त्रीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना
कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?’
असे अनेक प्रश्न कर्णाला सतावताहेत. कर्णाच्या आत्म्याला त्या प्रश्नांच्या जंजाळातून मुक्ती हवीय. कर्ण तेजस्वी, धैर्यशील, उदार, गुणसंपन्न. तरीही आयुष्यभर त्याला अपमान, अवहेलना सहन करावी लागते. त्याचा दोष नसतानाही त्याचं आयुष्य रखरखित वाळवंट होतं. अनेक व्यथा, वेदना भोगत त्याला जगावं लागतं आणि तरीही कर्ण त्यांना क्षमा करतो. शेवटी त्या लिहितात, ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,
हे धरित्री, हे मधुसूदना
मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे.’
ब्रह्मांडाला तेज देणारा आपला पिता आपल्यासाठी काहीच का करू शकला नाही, ही खंत वागवत, अखेरीस तो त्यालाही क्षमा करून टाकतो.
आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,
हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे.’
आणि कविता एका परमोच्च बिंदूशी येऊन थांबते.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈