सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

ही दुनिया एक प्रचंड मोठा रंगपट आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेली भूमिका यथाशक्ती वठवत असतो.  कोणी अगदी नटश्रेष्ठ ठरतो तर कुणाची नुसती दखल सुद्धा घेतली जात नाही. या सर्व खेळाचा सूत्रधार चराचर व्यापून उरलेला तो विश्वेश असतो. हा एक खूप मोठा चिंतनशील, विचारप्रवर्तक अभ्यासाचा विषय आहे. याच विषयावरील डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांची ‘संसाराच्या रंगपटावर’ ही अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला या खेळाचा जणू ट्रेलरच दाखवते.

☆ संसाराच्या रंगपटावर ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 

जगण्याला भूमिका घेवूनी

          सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

©️ डॉ.  निशिकान्त श्रोत्री

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

☆ रसग्रहण ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

हे तीन ओळींचे वेगळे असे या गीताचे वैशिष्ट्यपूर्ण ध्रुवपद आहे. या अखिल ब्रम्हांडात तो विश्वेश लपलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेला असतो. वेळोवेळी तो वेगवेगळी रुपे घेऊन साकार होतो. प्रत्येकातच हृदयस्थ आत्माराम म्हणजे तोच ईश्वरी अंश असतो. तोच वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने प्रकट होतो.

मंचावर येताना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||१||

या पहिल्या कडव्यात कवीने जन्म आणि मृत्यू या घटनांचे सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे. बाळ जन्माला आले की सर्वांना अतिशय आनंद होतो. नव्या जीवाचे जल्लोषात स्वागत होते. तोही आपल्या बाललीलांनी,  पुढे आपल्या गुणांनी सर्वांना कधी आनंद देतो तर कधी रडवतो. हे करीत असताना स्वतः त्यात न गुरफटका तो मात्र वाट्याला आलेली भूमिका जगून घेतो. शेवटी डाव संपला की खेळाची कनात उतरवली जाते म्हणजे त्याचा मृत्यू होतो. त्यावेळी मात्र त्याच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख होते. याच पद्धतीने तो विश्वेश वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळी भूमिका साकारत असतो. इथे कनात उतरवण्याच्या रूपकातून मृत्यूची संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. एखाद्या डाव किंवा खेळ संपला की उभारलेली कनात उतरवतात. त्याचप्रमाणे जन्माला आलेला जीव मृत्यू पावतो. ही कनात उभारण्याची आणि कनात उतरवण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

जन्माला आलेला जीव आपली भूमिका कशी निभावतो हे कवीने या दुसऱ्या कडव्यात विशद केलेले आहे. कधी कधी जगण्यासाठी काही विहित कर्म बरोबर घेऊन त्याला योग्य अशी भूमिका घेऊनच हा जीव जन्माला येतो. कधी राजा म्हणून, तर कधी उच्चपदस्थ कार्यनिपुण अधिकारी म्हणून, कधी कलानिपुण कलाकार म्हणून, तर कधी समाजाचे भूषण अशी सन्माननीय व्यक्ती म्हणून जन्माला येतो. कर्तृत्वाचा, सन्मानाचा शेला पांघरून येतो. तर कधी तपस्वी, संन्याशी, विरक्त योगी बनून सर्वांना जीवनाचे वर्म, जगण्याचे प्रयोजन, सार्थकता याविषयी प्रबोधन करतो. असा हा विश्वेश अखंड ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो. सगळी पृथ्वी किंवा अख्खी सूर्यमालाही जिथे त्याला सामावून घेऊ शकत नाही तिथे देशाच्या सीमांचा तर प्रश्नच येत नाही. त्यात तो मावणारच नाही.

समाजात आदर्श म्हणून आदर सन्मान मिळून सन्मानाचे उच्च पद मिळणे आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य, सौख्य उपभोगणे यालाच भरजरी शेल्याचे रूपक योजिले आहे. तर उग्र तपश्चर्या करून वैराग्य प्राप्त केलेले विरक्तयोगी तपस्वी यांच्यासाठी नागव्याचे रूपक योजिले आहे. म्हणजे ते जगरुढीत न गुरफटता आपली वाट आपल्या मनाप्रमाणे चोखाळतात.

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधात राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||३||

या तिसऱ्या कडव्यात अविनाशी आत्म्याचा प्रवास कवीने स्पष्ट केलेला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति  नरोऽपराणी

तथा शरीराणि विहाय  जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ||

गीतेतील या श्लोकाचा अर्थ कवीने इथे अधिक स्पष्ट केलेला आहे. जसा खेळ संपला की पडदा पडतो. त्याप्रमाणे आपले विहितकर्म संपले की जीवाचा शेवट म्हणजे मृत्यू होतो. आत्मा हा जीव सोडून निघून जातो. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र जीर्ण झाले की ते बदलून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आत्मा एका देहातून निघाला की दुसऱ्या नवीन देण्यात अवतीर्ण होतो. इथे कवी म्हणतो की त्या जीवाचे जगणे संपले, पण कर्म अजून शिल्लक राहिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहाला शोधत फिरतो. अशाप्रकारे तो एका देहानंतर दुसऱ्या देहाच्या शोधासाठी नव्या जोमाने फिरत राहतो आणि नवीन वेश परिधान करून नव्या भूमिकेत रंगपटावर येतो.

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||४||

एक भूमिका संपते. पुढे दुसरी,  त्यातून तिसरी असा जीवाचा प्रवास सुरूच असतो. त्याचे वर्णन कवीने या शेवटच्या कडव्यात केलेले आहे.

पुन्हा नवा खेळ सुरू होतो. नवीन भूमिका असते. पण त्याची नेमकी कथा कुणालाच ठाऊक नसते. आपण म्हणतो ना,  ” प्रारब्धात काय काय लिहून ठेवले आहे कुणास ठाऊक ?” पण त्या अज्ञानात सुख मानून जगताना आपण कशासाठी जन्माला आलो?  आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचाच विसर पडतो आणि या देहाचे चोचले पुरविण्यात देहात रमून जातो. त्या जीवाला आपल्या संवादाची तोंड ओळखली नसते. हा नवा प्रवेश किती काळाचा आहे हेही ठाऊक नसते. तरीही तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन रंगपटावर येत असतो.

या सर्व प्रवासातून हे कळते की, आत्मा अविनाशी आहे, तो जुने वस्त्र बदलावे तसा देह बदलतो. पण एका जीवातून दुसऱ्यात प्रवेश, एका भूमिकेतून नव्याने वेषांतर करून नवी भूमिका वठवत या आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. कथा, संवाद, कार्यकाळ काहीही आधी माहीत नसताना काही भूमिका अप्रतिम ठरतात. समाज मानसात कायमच्या कोरल्या जातात. तर काही उत्तम, काही ठाकठीक, काही सुमार, तर काही अगदीच नाकारल्या जातात.

ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर असतो आणि तो वेगवेगळी रूपे घेत प्रकटतो. तर प्रत्येक जीव अंतरात्म्यामुळे वेगवेगळ्या भूमिका वठवतो हे मुख्य रूपक आहे.

पहिल्या कडव्यात कनात खाली उतरणे या रूपकातून मृत्यू होणे हा अचूक अर्थ स्पष्ट होतो.

दुसऱ्या कडव्यात भरजरी शेला हे सामाजिक मानसन्मान, ऐश्वर्य, सौख्य यासाठी योजलेले रूपक आहे. तर नागवा हे रूपक निर्भीडपणे, परखडपणे समाज प्रबोधन करणारा विरक्त योगी, संन्यासी यांच्यासाठी योजले आहे .

तिसऱ्या कडव्यात पडदा पडला की खेळ संपतो या रूपकातून मृत्यू झाला की  जीवात्मा तो देह सोडून जातो आणि ती भूमिका संपते ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीने उत्तम शब्द योजनेतून ही कविता जन्म-मृत्यूचे अव्याहत सुरू असणारे चक्र, त्या मागचा सूत्रधार आणि त्याच्या विविध भूमिका अतिशय सुंदर रीतीने विशद करते. जगाच्या व्यवहारावर अगदी चपखल शब्दात प्रभावीपणे प्रकाश टाकणारी डॉक्टर श्रोत्री यांची ही एक अतिशय सुंदर  कविता आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments