सौ. ज्योत्स्ना तानवडे
काव्यानंद
☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
डाॅ. निशिकांत श्रोत्री
राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….
कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव. ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा, श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित, एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.
☆ राजकपूर … कवी — डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆
☆
कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||
☆
तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची
वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची
द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||१||
☆
देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला
धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना
दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||२||
☆
मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी
काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी
करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||३||
©️ डॉ. निशिकांत श्रोत्री
मो. ९८९०११७७५४
☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||
चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.
तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची
वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची
द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||
प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.
देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला
धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना
दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||
राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.
मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी
काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी
करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी
राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||
धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.
सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈