श्रीमती अनुराधा फाटक
☆ काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
कोणत्याही कवितेची परिपक्वता कविच्या विचार परिपक्वतेवर अवलंबून असते आणि विचार अनुभवसिध्दतेवर आधारलेले असतात.जेव्हा कवीकडून एखाद्या कवितेची प्रसव प्रक्रिया सुरु होते तेव्हा त्याच्या मनातला कल्लोळ आपोआप शब्दबध्द होत असतो.ती कविता वाचक वाचतो तेव्हा ती त्याला विचारप्रवृत्त करते मग त्याला भावेल तसा अर्थ तो लावत जातो त्यामुळे एकाच कवितेतून वेगवेगळे अर्थ निर्माण होऊ शकतात.
कवी मधुकर जोशी यांची,’माती सांगे कुंभाराला !’ ही कविता अशीच विचारप्रवृत्त करणारी आहे.कुंभार ज्या मातीपासून घट निर्मिती करतो ती माती साधीसुधी नसते.एका विशिष्ठ प्रकारच्या मातीत घोड्याची लीद,शेण,राख, धान्याची टरफले मिसळलेली असतात. कुंभार ती माती भिजवून आपल्या पायाखाली तुडवून तुडवून एकजीव करतो.ते करताना त्याच्या मनातील विचार मातीवर संस्कारीत होत असतात. गोरा कुंभार विठ्ठलाचे अभंग गात चिखल तुडवीत असे.
पण ज्या मातीपासून कुंभार घट बनवितो त्या मातीला कुंभाराची आपल्याला पायाखाली तुडविण्याची क्रिया आवडत नाही.म्हणून ती कुंभाराला,
‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’असे ठणकावून सांगते.
ती म्हणते,हे कुंभारा मला चाकावर फिरवत तुझ्या हातातल्या कौशल्याने तू वेगवेगळ्या आकाराचे सुबक, सुंदर घट बनवितोस. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने वापरले जातात ते,
‘लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी !’ असतात
लग्नमंडपापासून मानवाच्या अंतीम यात्रेपर्यंत, चांगल्यावाईट सर्व ठिकाणी मी (माती)असते। स्वतःला शूर वीर समजणारे शेवटी माझ्याजवळच येतात. हे माणसा त्याशिवाय पर्याय नाही हे माहीत असतानाही तू कशाला ताठ रहातोस, गर्वाने फुगतोस? भाग्यवान, भाग्य संपवत जगणाऱ्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही तेव्हा हे कुंभारा, मला पायी तुडवताना,
‘तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी ! याचा विचार कर.’
कवी मधुकर जोशी यांच्या कवितेतला कुंभार म्हणजे विश्वनियंता ! पृथ्वी, आप , तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतापासून या विधात्याने विविध आकार, रंगातून मानव निर्माण केला.पण ज्याने आपल्याला निर्माण केले, हे जग दाखवले त्यालाच हा स्वार्थी माणूस विसरला. फक्त स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाला आपला पराक्रम, सौंदर्य यांचा गर्व झाला.त्याचा अहंकार फुग्याप्रमाणे फुगला. जसा कुंभार तुडवताना मातीला विसरला तसा माणूस पंचमहाभूतांचा उपभोग घेताना त्याच्या निर्मात्याला, विश्वनियंत्याला विसरला.
आपल्या नियतीचे चाक त्याच्या हातात आहे याचेही भान मानवाला राहिले नाही. धुंदीचा कैफ चढलेला स्वार्थी मानव विधात्याने लिहिलेला भाग्यलेखच खरा ठरणार ही जाणीव हरवून बसला.त्याने जन्मापासून आपले मातीचे असलेले दुर्लक्षित केले.
‘माती असशी मातीस मिळशी’ हे सत्य लक्षात ठेवून प्रत्येकाने जगावे हाच संदेश या कवितेतून मिळतो.
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
माती सांगे :
श्रीमती अनुराधा फाटक यांनी केलेल्या रसग्रहणामुळे
या लोकप्रिय गीताचा आनंद आज द्विगुणीत झाला.रसग्रहणाच्या सुरूवातीला कवितेच्या निर्मिती विषयी त्यांनी केलेले विवेचन अत्यंत समर्पक आहे.
सुंदर रसग्रहण