डाॅ. मीना श्रीवास्तव

महत्वाचे निवेदन

काव्यानंद  या सदरात मराठी भाषेतील  कवितेचे रसग्रहण  अपेक्षित  आहे.आज आम्ही अपवादात्मक  बाब म्हणून  हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण  प्रकाशित  करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य  प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य  पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.

संपादक  मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.         

सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले. 

त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे.  ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments