सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ माळ गुंफितांना… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ माळ गुंफितांना… स्व. वि. दा. सावरकर ☆
माळ गुंफितांना । ऐका कवनाला । गुंफी कोण कशी माला ॥
घाली जगदंबा । त्रिगुणातीताला । त्रिगुणी बिल्वदली माला ॥
प्रकृतीदेवी गुंफी । देव विराटासी । नव नव सूर्यमालिकांसी ॥
प्रलयंकर काली । गुंफी महाकाला । ती नरमुंडचंड माला ॥
उद्भवा घाली । घाली उद्भवाला । सृष्टी भूकंपांची माला ॥
गुंफी सत्यभामा । श्रीहरीला साची । माला पारिजातकांची ॥
माळ मोत्यांची । गुंफी रुचिरा ती । राणी राजाच्यासाठी ॥
फुलांची माला । माला ओवी रती ॥ आलिंगि त्या अनंगा ती ॥
विरहिणी परि ती । प्रिय स्मरण काला । ओवी अश्रूंची माला ॥
कवी – वि. दा. सावरकर
रसग्रहण
सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक उंची व भावनिक खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं. त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.
जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात वास करते असं मानलं जातं.
प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन
सूर्यमाला गुंफित आहे.
कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली अशी कथा आहे.
सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.
सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.
शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.
विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈