सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अब्रूकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

विश्वाच्या निर्मितीत जगन्नियंत्याने एक सर्वांगसुंदर निर्मिती केली ती म्हणजे स्त्रीची. शिवाय तिला सृजनत्वाचे वरदान देऊन श्रेष्ठत्वही बहाल केले. स्त्री पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ. पण स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे. तिला सतत अत्याचार, अन्याय सहन करावे लागतात. त्यात तिची चूक काहीच नसते. अशाच एका पीडितेने अख्ख्या जगाला आपल्या सन्मानासाठी अतिशय कळवळून केलेला प्रश्न आणि  शेवटी पेटून उठत दिलेले आव्हान म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता ‘अब्रू’. या अतिशय गाजलेल्या कवितेचा आपण आज रसास्वाद घेणार आहोत.

अब्रू कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

झगमगत्या ट्यूबलाईट्सनी उजळलेल्या

रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या

आणि माणसांच्या झुंडींनी गजबजलेल्या,

छोट्याश्या अणकुचीदार टाचणीपासून

भल्या मोठ्या अजस्त्र विमानांपर्यंत

सारं काही सहज मिळणाऱ्या

जगाच्या या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

 

तिचं मोल द्यायला

ना माझ्यापाशी धनाच्या राशी

ना कीर्तीचे डोंगर,

जवळ तसं काहीच नाही …

मी तर फुटक्या नशिबाची

एक दरिद्री अभागिन

लंकेची पार्वती!

तरीही फुकट कोण देणार

म्हणून बरोबर घेतले होते

माझे लाख मोलाचे शील

तेव्हढीच माझी पुंजी!

 

ठाऊक नव्हते मला

या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कोहळ्याच्या मोलाने मिळतो

छोटासाच, पण

दात आंबवणारा  आंबटढाण आवळा!

किती गच्च आवळून सशासारखी

उराशी धरावी लागत होती मला

माझी एकुलती एक पुंजी!

 

त्या पुंजीवरच माझ्या

डोळा फार सगळ्यांचा

डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,

खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा

अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;

मग दलालांचे तर काही विचारूच नका…

सगळीच गिधाड!

झाडावरचे कावळे देखील भेदरून

उगीचच आपले काणे डोळे

इकडून तिकडे टोलवत बसलेले!

 

उमगलंच नाही मला

केव्हा लुटली गेली

माझी जिवाभावाची पुंजी

मनानं नाही तरी

देहानं मात्र

करायला मला शीलभ्रष्ट …..

फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच

अन् रुपालाही

अंवसेचा काजळ काळिमा …..

तरीहि माझ्या पदरात

अब्रू नाही ती नाहीच!

 

दया करा हो, दया करा

पोटाची भूक मारेन

पण अस्तित्वाचीच होणारी

फरपटवणारी ही उपासमार

कुठवर सोसावी आता

अशा अगतिक अवस्थेत?

उसनी म्हणून तरी 

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

 

इथ सगळ विकतच मिळत

ठाऊक आहे मला

पण माझी पुंजीच

लुटली गेली आहे हो!

अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक!

तरी पण मला हवी आहे

एखादी फाटकी तुटकी तरी

कसलीही अब्रू

उसनी द्या, खात्यावर द्या

नाहीतर भीक म्हणून द्या

पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या!

 

नाही देत?

का हो?

काय चुकल माझं?

तुमच्याच भल्यासाठी ना

उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू

हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत

सगळ्यांचाच होम करून

राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा?

मग आता मात्र

तोंड का वळवता?

 

अखेरचेच मागते आहे

तुमच्या पुढे पदर पसरून

मला अब्रू हवी आहे

मला अब्रू द्या.

 

मुकाट्यानं द्या,

बऱ्या बोलानं द्या …..

नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला

तुमच्या अब्रूची लक्तरं

उघड्यावर टांगून

याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कारण …..

मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे!

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी. जी. ओ. / मो ९८९०११७७५४

झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेल्या

रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या

आणि माणसांच्या झुंडींनी  गजबजलेल्या

छोट्याशा अणकुचीदार टाचणीपासून

भल्या मोठ्या अजस्त्र विमानांपर्यंत

सारं काही सहज मिळणाऱ्या

जगाच्या या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

जगाचं हे मोठंच्या मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. ते झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेलं आणि रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेलं आहे. इथे छोट्याशा टोकदार टाचणी पासून अजस्त्र मोठ्या विमानापर्यंत अगदी कोणतीही गोष्ट सहजपणे मिळते. मग या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मला माझी अब्रू , माझा सन्मान मिळेल का हो ? असे एक पीडित स्त्री विचारते.

कवीने इथे अख्ख्या जगालाच एका डिपार्टमेंटल स्टोअरचे रूपक योजले आहे. ते स्टोअर अतिशय समृद्ध आहे. इथे काही नाही असे नाहीच. ते अतिशय आकर्षक आहे जणू काही एखादं भुलभुलैय्या नंदनवनच.पण इथे सर्व काही मिळत असतानाही स्त्रीला मात्र काही गोष्टींपासून वंचित ठेवले जाते. आजूबाजूच्या एवढ्या विशाल जगात तिला मात्र कोणी वाली मिळत नाही ही गोष्ट तिला हतबल करून सोडणारी आहे .

ही मुक्तछंदातली कविता आहे. प्रथम पुरुषी एकवचनातली ही कविता एका अत्याचार पीडितेची कहाणी,आर्त तळमळ कथन करते. पण ती फक्त एका स्त्रीची कहाणी एवढीच मर्यादित न रहाता अवघ्या स्त्री जातीची व्यथा वेदना इथे मांडते आहे.

तिचं मोल द्यायला

ना माझ्यापाशी धनाच्या राशी

ना कीर्तीचे डोंगर

जवळ तसं काहीच नाही

मी तर फुटक्या नशिबाची

एक दरिद्री अभागिन

लंकेची पार्वती !

तरीही फुकट कोण देणार

म्हणून बरोबर घेतले होते

माझे लाख मोलाचे शील

तेवढीच माझी पुंजी !

पण या स्त्रीची अवस्था दयनीय झालेली आहे. तिच्यापाशी धनदौलत नाही. तिचं असं काहीच ऐश्वर्य नाही. जे खरेदीसाठी उपयोगी पडेल असं हाती काहीच नाही. इथे ‘लंकेची पार्वती’ हे रूपक तिची अवस्था स्पष्ट करते. ती पूर्ण परावलंबी आहे. तिला कसलेही निर्णय स्वातंत्र्य नाही. हाती धन नाही. सर्वच गोष्टींपासून ती वंचित आहे. फक्त तिची पुंजी म्हणून तिच्याकडे तिचं शील तेवढंच आहे. त्यामुळे ती हतबल झालेली आहे.

ठाऊक नव्हते मला

या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कोहळ्याच्या मोलाने मिळतो

छोटासाच, पण

दात आंबवणारा आंबटढाण आवळा !

किती गच्च आवळून सशासारखी

उराशी धरावी लागत होती मला

माझी एकुलती एक पुंजी !

या जगाच्या व्यवहारात फसवणूक करणारेच जास्त असतात. आवळा देऊन कोहळा काढणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो. ज्याच्यामुळे दात आंबतात असा अगदी छोटासा आंबटढाण आवळा देऊन त्या बदली मोठा पौष्टिक कोहळा ते चतुराईने मिळवतात. या मतलबी लोकांचे कारस्थान ती ओळखू शकत नाही. त्यांच्यात अगदी घाबरून वावरत रहाते. पैशाच्या जोरावर गैरकृत्य करणाऱ्यांचे वर्तन वरून कधीच लक्षात येत नाही म्हणूनच खोटी प्रलोभनं दाखवून या ना त्या कारणाने तिची फसवणूक करत तिचे शील लुटले जाते आणि पुन्हा तिलाच बदनाम करून घरातून बेदखल केले जाते. अन्याय करणारे अंधारात रहातात आणि शिक्षा मात्र तिच्याच माथी येते हे खरे दुर्दैव आहे.

त्या पुंजीवरच माझ्या

डोळा फार सगळ्यांचा

डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,

खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा

अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;

मग दलालांचे तर काही विचारूच नका….

सगळीच गिधाड !

झाडावरचे कावळे देखील भेदरून

उगीचच आपले काणे डोळे

इकडून तिकडे टोलवत बसलेले !

तिच्या त्या पुंजीवरच त्या स्टोअरमधील सर्वांचा डोळा होता. तिथे विक्री करणारे व्यापारी, खरेदी करणारे ग्राहक, अगदी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंचा सुद्धा मग दलालांचे तर काही विचारूच नका. ते टपलेलेच होते. एकजात सगळी बुभुक्षित गिधाडं. झाडावरचे कावळे सुध्दा मदतीला तर येत नव्हते, पण नजर इकडे तिकडे फिरवत त्रयस्थपणे फक्त मजा मात्र बघत होते.

इथे व्यापारी, गिऱ्हाईक, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके आहेत. आजकालचे वास्तवही हेच सांगते आहे. तिची बोली लावणारे, तिच्यावर अत्याचार करणारे, हे सर्व तटस्थपणे त्रयस्थांसारखे पाहणारे तिच्या जवळचे, नात्यातले सुद्धा असू शकतात. मग परक्यांची गोष्ट तर विचारायलाच नको. माणसंच माणसांना कशा प्रकारे वागवू शकतात हे कुणालाच सांगता येणार नाही

ही गोष्ट तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. द्रौपदी वस्त्रहरण हे तर याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यावर अत्याचार करवणारे, करणारे आणि हतबलपणे ते बघत निष्क्रिय रहाणारे तर रथी-महारथी असूनही होणारा अनर्थ ते टाळू शकले नाहीत. खरे तर अशावेळी माणुसकी म्हणून सुध्दा कोणीही मदतीला येत नाही. सगळेच नुसती बघ्याची भूमिका घेतात हेच दुर्दैव आहे. धाडस करून कुणी मदतीला आलेच तर होणारा अनर्थ निश्चित टळू शकतो अशीही उदाहरणे आहेत. या वास्तवावर कवी इथे उत्तम भाष्य करतो.

उमगलंच नाही मला

केव्हा लुटली गेली

माझी जिवाभावाची पुंजी

मनानं नाही तरी

देहानं मात्र

करायला मला शीलभ्रष्ट…

फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच

अन् रुपालाही

अंवसेचा काजळ काळिमा…

 तरीहि माझ्या पदरात

अब्रू नाही ती नाहीच !

तिची फसवणूक करत तिचं शील केव्हा लुटलं गेलं हे तिला सुध्दा समजल नाही. मनाने ती  पवित्र होती पण  देहाने त्यांनी तिला शीलभ्रष्ट केले.  तिच्या अवघ्या अस्तित्वाला  काळिमा फासला आणि तिला बेरूप केले गेले. एवढं सगळं अघटीत घडूनही त्या बदल्यात  तिच्या पदरात अब्रू नाहीच पडली हे  तिचे  मोठे दुर्दैव .

तिचा काहीच दोष नसताना  झालेल्या इतक्या लुबाडणूकीने  तिला जगणे अशक्य झाले. तिचे मन शुद्ध असूनही समाज तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्यामुळे तिला उजळ माथ्याने जगणे अशक्य झाले.

दया करा हो, दया करा

पोटाची भूक मारेन

पण अस्तित्वाचीच होणारी

फरपटवणारी ही उपासमार

कुठवर सोसावी आता

अशा अगतिक अवस्थेत ?

उसनी म्हणून तरी

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

या होणाऱ्या दयनीय अवस्थेने ती स्त्री अगदीच लाचार झालेली आहे. ती एक वेळ भूक सहन करेल. कारण देहाच्या  या गरजेकडे  दुर्लक्ष करता येईल. पण तिच्या मनाचे काय? तिच्यावर ओढवलेल्या दुरावस्थेमुळे तिच्या पूर्ण अस्तित्वालाच काळीमा फासलेला आहे. समाजात तिला आता मानाचे स्थान राहिलेले नाही. सगळे जग तिच्याकडे कुत्सित नजरेने बघत आहे आणि ही मनाची कुचंबणा तिला अतिशय असह्य होते आहे.

त्यामुळे तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला समाजाकडून सन्मानाची अपेक्षा आहे. तिची कुणी हेटाळणी करू नये. जी चूक तिने केलीच नाही त्याची शिक्षा तिच्या माथी मारू नये आणि तिचे जगणे शांतपणे तिला जगू द्यावे हीच तिची रास्त अपेक्षा आहे.

इथे सगळं विकतच मिळतं

ठाऊक आहे मला

पण माझी पुंजीच

लुटली गेली आहे हो !

अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक !

तरी पण मला हवी आहे

एखादी फाटकी तुटकी तरी

कसलीही अब्रू

उसनी द्या, खात्यावर द्या

नाहीतर भीक म्हणून द्या

पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या !

वेगवेगळी प्रलोभने  दाखवून तिची फसवणूक केली गेली.  तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले आणि यासाठी तिलाच जबाबदार धरण्यात आले. तिलाच बदनाम ठरवून समाजातून उठवले गेले. त्यामुळे घायाळ होऊन ती पुन्हा पुन्हा सर्वांकडे मिनतवारी करते आहे. यात ती पूर्ण निर्दोष आहे म्हणूनच तिला लोकांकडून माणुसकीची अपेक्षा आहे.

नाही देत ?

का हो ?

काय चुकलं माझं ?

तुमच्याच भल्यासाठी ना

उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू

हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत

राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा ?

मग आता मात्र

तोंड का वळवता ?

अखेरचेच मागते आहे

तुमच्यापुढे पदर पसरून

मला अब्रू हवी आहे

मला अब्रू द्या.

कधी घराण्याच्या वारसासाठी, कधी हुंड्यासाठी, कधी आणखी काही मागण्यांसाठी  स्त्रीलाच वेठीला धरले जाते. अगदी प्रगतीच्या मार्गात तिचा शिडीसारखा  वापरही काहीवेळा होतो. त्यासाठी सतत मानहानी, छळ, मारहाण, जोरजबरदस्ती केली जाते.

पण या सगळ्याला तिलाच जबाबदार धरले जाते. तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते .शेवट तिला जाळून मारले जाते, नाही तर तिला आत्महत्या करायला भाग पाडले जाते. ती घरासाठीच हे सर्व करत असूनही तिलाच कुलटा ठरवत घराबाहेर काढले जाते. तिला पूर्ण बदनाम करीत परावलंबी बनवले जाते.  यातून बाहेर पडण्यासाठीच  तिची ही सन्मानासाठी मागणी आहे.

मुकाट्यानं द्या,

बऱ्या बोलानं द्या…

नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला

तुमच्या अब्रूची लक्तरं 

उघड्यावर टांगून

याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कारण ….

मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे !

तिने सर्व पद्धतीने त्यांच्या विनवण्या केल्या. आपल्याला असे बदनाम करू नये.  आपले निरपराधीत्व मान्य करून पुन्हा मान द्यावा अशी मागणी केली आहे. सरळपणे हे जर मान्य नाही  न केले तर त्यांच्या कुकर्माचा पाढा सर्व समाजापुढे वाचून त्यांच्याच गुन्ह्याची, अब्रूची लक्तरे सर्वांसमोर उघड करायची धमकी दिली आहे. आपल्यावरील अन्यायाने ती आता परती पेटून उठली आहे.त्यामुळे ती आता गप्प रहाणार नाही. नारी शक्ती जर चवताळून उठली तर काय करू शकते हे समाजाने वेळीच लक्षात घेतले पाहिजे. एकवटलेली स्त्री शक्ती समाजात उलथापालथ घडवू शकते. कारण स्त्री शिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. पुरुषाला भावनिक मानसिक आधारासाठी स्त्रीची गरज असते. त्यामुळे तिला योग्य सन्मान देणे हे अगत्याचेच आहे. एकीकडे पूजा करायची आणि दुसरीकडे लाथाडायचे हे पूर्ण थांबवले पाहिजे.

अतिशय भावपूर्ण अशा या कवितेत  डिपार्टमेंटल स्टोअर हे प्रचंड विश्वाचे रूपक, तर त्यातले विक्रेते, खरेदीदार, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके, आवळा, लंकेची पार्वती ही रूपके आहेत. यातून माणसेच माणसांना किती अन्याय्य पद्धतीने वागवतात, कसे अत्याचार करतात हे अचूकपणे सांगितलेले आहे. असे अत्याचार करणारे अगदी जवळचे किंवा दूरचे कोणीही असू शकतात. अशावेळी बाहेरचे त्रयस्थपणे फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे तिला वाचवायला कोणीच नसते. वास्तवात घडणाऱ्या अशा घटनांनी मन सुन्न होते. अशा घटनांचे वास्तव कवीने या कवितेत नेमक्या शब्दात मांडलेले आहे.

कवीने  तिची भावनिक, मानसिक स्पंदने अचूक शब्दांत टिपलेली आहेत. त्यातली आर्तता, तिची कासाविशी आपल्या मनाला जाऊन भिडते. आज काळ बदलला आहे. स्त्रीने आपले कर्तृत्व प्रत्येक आघाडीवर सिद्ध केलेले आहे. तरीही तिचे भोग पूर्णपणे संपलेत असे झालेले नाही. फक्त त्याची रूपे बदलली आहेत.

स्त्रीच्या एका दाहक, जीवघेण्या अनुभवाची ही करूण कहाणी  डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘अब्रू’ या भावस्पर्शी कवितेतून सांगितली आहे. तिची अनुभूती आपल्याला बेचैन करून जाते. शेवटी ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हे दुर्दैवी वास्तव आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments